scorecardresearch

स्वीस खुली बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्यची माघार; सिंधू, श्रीकांतवर मदार

ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील उपविजेता लक्ष्य सेनच्या अनुपस्थितीत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्वीस खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) भारताची मदार दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत यांच्यावर असेल.

पीटीआय : ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील उपविजेता लक्ष्य सेनच्या अनुपस्थितीत मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्वीस खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) भारताची मदार दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदम्बी श्रीकांत यांच्यावर असेल. सलग दोन स्पर्धामध्ये सहभागी झाल्यानंतर थकवा जाणवल्यामुळे लक्ष्यने स्वीस खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. लक्ष्यने गेल्या दोन आठवडय़ांत चांगली कामगिरी केली; पण सिंधू, श्रीकांत आणि सायना नेहवाल यांना ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा टप्पाही गाठता आला नाही. त्यामुळे स्वीस स्पर्धेत त्यांच्या कामगिरीत सुधारणेचा प्रयत्न असेल.

सिंधू आणि सायना यांना जर्मन व ऑल इंग्लंड या सलग दोन स्पर्धामध्ये दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. श्रीकांतला मात्र जर्मन स्पर्धेच्या अंतिम आठमध्ये पोहोचण्यात यश आले होते. सिंधूला स्वीस स्पर्धेसाठी दुसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत तिचा डेन्मार्कच्या ३२व्या मानांकित हॉयमार्क केयर्सफेल्डशी सामना होणार आहे. सायनाची चीनच्या सातव्या मानांकित वांग झी यीशी गाठ पडेल. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होणार आहे. तसेच बी. साईप्रणीत आणि एचएस प्रणॉय हे भारतीय खेळाडू पहिल्या फेरीत आमनेसामने येतील.

सात्विक-चिराग जोडीवर नजर

तिसऱ्या मानांकित सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीपुढे पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत मुहम्मद शोहिबुल फिक्री आणि बागस मौलाना या इंडोनेशियाच्या जोडीचे आव्हान असेल. एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला, कृष्ण प्रसाद गर्गा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला यांच्या कामगिरीवरही चाहत्यांचे लक्ष असेल. ऑल इंग्लंड स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या योंगकोल्फान कितिथाराकुल आणि राविंदा प्रायोंगगाई जोडीशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swiss open badminton tournament goal retreat sindhu srikanth ysh

ताज्या बातम्या