scorecardresearch

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा ; सिंधू, प्रणॉय अंतिम फेरीत

महिला एकेरीच्या ७९ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगचा २१-१८, १५-२१, २१-१९ असा पराभव केला.

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी शनिवारी स्विस खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाची अंतिम फेरी गाठली.

महिला एकेरीच्या ७९ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाँगचा २१-१८, १५-२१, २१-१९ असा पराभव केला. याचप्रमाणे पुरुषांच्या उपांत्य लढतीत प्रणॉयने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिनटिंगला २१-१९, १९-२१, २१-१८ असे नामोहरम केले. तब्बल पाच वर्षांनी प्रणॉयने आंतरराष्ट्रीय स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

द्वितीय मानांकित सिंधूची रविववारी अंतिम फेरीत थायलंडच्या चौथ्या मानांकित बुसानन ओंगबामरुंगफानशी गाठ पडणार आहे, तर प्रणॉयची सहकारी किदम्बी श्रीकांत किंवा इंडानेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीशी सामना होईल.

जानेवारीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या सिंधूने पहिल्या गेममध्ये १५-७ अशी आघाडी घेतली. परंतु सुपानिडाने कडवी लढत देत अंतर कमी केले. परंतु सिंधूने पाच सलग गुणांसह पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सुपानिडाने १६-७ अशी आघाडी घेतली. पण सुरुवातीला झगडणाऱ्या सिंधूने नंतर वेगाने गुण घेतले, तरीही सुपानिडाने दुसरा गेम जिंकत बरोबरी साधली.

निर्णायक गेममध्ये सिंधूने आधी ४-१ अशी आघाडी घेतली. पण सुपानिडाने ७-७ अशी बरोबरी साधली. विश्रांतीला सिंधूकडे एका गुणाची आघाडी होती. नंतर सिंधूने खेळाचा वेग वाढवत १६-१३ अशी आगेकूच केली. पण सुपानिडाने १८-१८ अशी बरोबरी साधली. नंतर १९-१९ अशी पुन्हा बरोबरी झज्ञली. अखेरीस सिंधूने दोन उत्तम गुणांसह सामना खिशात घातला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swiss open badminton tournament two olympic medalists pv sindhu hs pranoy akp

ताज्या बातम्या