एपी, व्हँकुवर : रुबेन व्हर्गास आणि योहान मन्झाम्बी यांच्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंड संघाने कॅनडाला २-१ अशा फरकाने नमवत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘बी’ गटात अग्रस्थान मिळवले. कॅनडा संघ या सामन्यातील पराभवानंतरही स्वित्झर्लंडसह पुढच्या फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. प्रॉमिस डेव्हिडने कॅनडासाठी एक गोल केला. कॅनडा या गटात स्वित्झर्लंडनंतर दुसर्‍या स्थानी राहिले. त्यांनी प्रथमच बाद फेरीत स्थान मिळवले.

कॅनडाला गटात अग्रस्थान मिळवण्यासाठी विजय किंवा बरोबरीची गरज होती. मात्र, आता गटात दुसरे स्थान मिळवल्याने त्यांना यंदाच्या स्पर्धेत प्रथमच मायदेश सोडून अमेरिकेत खेळावे लागले. ‘राउंड ऑफ ३२’च्या लढतीत त्यांचा लॉस एंजलिस येथे दक्षिण आफ्रिकेशी सामना होईल. स्वित्झर्लंड सात गुणांसह शीर्ष स्थानी राहिला. कॅनडा, तसेच बोस्निया आणि हर्जेगोव्हिना यांचे समान चार गुण झाले. मात्र, सरस गोलफरकामुळे कॅनडा संघ दुसर्‍या स्थानी राहिला.

स्वित्झर्लंडचा कर्णधार ग्रॅनिट झाकाला पहिल्या सत्रात गोल करण्याची संधी मिळाली. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला त्याची फ्री-किक गोलजाळ्याच्या वरून गेली. यानंतर ४२व्या मिनिटाला अली अहमदने कॅनडाकडून गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वित्झर्लंडचा गोलरक्षक ग्रिगोर कोबेलने हा प्रयत्न हाणून पाडला.

मन्झाम्बीचा निर्णायक गोल

स्वित्झर्लंडच्या बोस्निया संघाविरुद्धच्या ४-१ अशा विजयात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मन्झाम्बीला कॅनडाविरुद्ध सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. दुसर्‍या सत्राच्या जवळपास ४० सेकंदानंतर व्हर्गासने स्वित्झर्लंडला आघाडी मिळवून दिली. कॅनडाचा गोलरक्षक मॅक्सिम क्रेपेऊचा चकवा देत व्हर्गासचा फटका गोलपोस्टला आपटून जाळ्यात गेला. यानंतर ५७व्या मिनिटाला ब्रील एम्बोलोने मन्झाम्बीला क्रॉस दिला. त्याचा फटका गोलरक्षकाच्या हाताला लागून गोलजाळ्यात गेला आणि स्वित्झर्लंड संघाने २-० अशी आघाडी घेतली. कॅनडाने ७६व्या मिनिटाला एक गोल करीत पुनरागमन केले. मात्र, त्यांना बरोबरीचा गोल करता आला नाही.