सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, मालविका अंतिम फेरीत

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सिंधू पाचव्या मानांकित कोसेत्सकायाचा सहजपणे पराभव करेल असे अपेक्षित होते.

भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिची रशियन प्रतिस्पर्धी एव्हगेनिया कोसेत्सकायाने पहिल्या गेमनंतर माघार घेतल्यामुळे सिंधूने आगेकूच केली. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सिंधूसमोर नागपूरच्या युवा मालविका बनसोडचे आव्हान असेल.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सिंधू पाचव्या मानांकित कोसेत्सकायाचा सहजपणे पराभव करेल असे अपेक्षित होते. माजी विश्वविजेत्या सिंधूने याआधी कोसेत्सकायाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले होते. शनिवारी झालेल्या सामन्यात सिंधूने पहिला गेम २१-११ असा मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर कोसेत्सकायाने दुखापतीमुळे सामना सोडण्याचा निर्णय घेतला आणि सिंधूला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.

महिलांच्या अन्य उपांत्य लढतीत २० वर्षीय बनसोडने भारताच्याच अनुपमा उपाध्यायवर १९-२१, २१-१९, २१-७ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. पहिला गेम दोन गुणांनी गमावल्यावर बनसोडने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये अवघ्या दोन गुणांनी बाजी मारल्यावर बनसोडने तिसरा गेममध्ये उपाध्यायला २१-७ अशी धूळ चारली.

मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या जोडीने भारताच्याच एमआर अर्जुन आणि ट्रेसा जॉली जोडीवर १८-२१, २१-१८, २१-११ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. त्यांच्यापुढे टी. हेमा बाबू आणि श्रीवेद्या गुर्झादाचे आव्हान असेल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Syed modi badminton tournament sandhu malvika in the final akp

Next Story
आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताकडून मलेशियाचा धुव्वा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी