थरारक… शाहरुख खानमुळे तामिळनाडूने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत जिंकली स्पर्धा

अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये तामिळनाडूने कर्नाटकच्या संघावर मात करत सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलीय.

syed mushtaq ali trophy finals
अंत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये तामिळनाडूला मिळाला विजय (फोटो बीसीसीआय आणि ट्विटरवरुन साभार)

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज तामिळनाडूने आपला किताब कायम राखण्यात यश मिळवलं आहे. तामिळनाडूच्या संघाने कर्नाटकच्या संघावर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलीय. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित २० षटकांमध्ये सात गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये तामिळनाडूने कर्नाटकवर चार गडी राखून मात मिळवली.

तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम श्रेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूने हैरदाबादच्या संघाला पराभूत करुन तर कर्नाटकने विदर्भाच्या संघाला धूळ चारत अंतिम सामन्यात धडक मारलेली. तामिळनाडूचं नेतृत्व विजय शंकरने तर कर्नाटकचं नेतृत्व मनीष पांडेने केलं.

मनीष पांडेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कर्नाटकला दुसऱ्याच षटकामध्ये पहिला झटका बसला. रोहन कदम हा सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्यानंतर करुण नायर आणि पॉवर प्ले संपण्याआधी संघाची धावसंख्या ३२ वर असताना मनिष पांड्येचा रुपात तिसरा गडी तंबूत परतला. कर्नाटकच्या मधल्या फळीमधील करुन नायर (१८), बी. आर. भरत (१६) या दोघांना अपयश आल्यानंतर अभिनवर मनोहर आणि प्रवीण दुबे यांनी चांगली फलंदाजी करत संघाला १५० हून अधिक धावा झळकावण्यास मदत केली. जगदीशा सुचिताने सात चेंडूत केलेल्या १८ धावाही कर्नाटकसाठी महत्वाच्या ठरल्या.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेल्या तामिळनाडूच्या सलामीवीर हरी निशांत आणि नारायन जगदीशनने चांगली फलंदाजी करत डावाला सुरुवात केली. चार षटकांमध्ये संघाची धावसंख्या २९ वर एक गडी बाद अशी होती. चौथे षटक पूर्ण होण्याच्या एक चेंडू आधीच हरी निशांत धावबाद जाला. नारायन जगदिशनने ४१ धावांची खेळी केली. साई सुदर्शन आणि विजय शंकर तसेच संजय यादव यांना नावाला साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. मात्र शाहरुख खानने १५ चेंडूंमध्ये ३३ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेटच्या षटकामध्ये १६ धावांची गरज असताना शाहरुखने संयमी खेळी करत संघाला सामना आणि स्पर्धा दोन्ही जिंकून दिलं. शाहरुखने षटकार मारुनच संघाला विजय मिळवून दिला.

शाहरुख खानने महत्वाच्या क्षणी केलेल्या ३३ धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Syed mushtaq ali trophy 2021 final highlights tamilnadu beat karnataka by four wickets scsg

ताज्या बातम्या