Jharkhand vs Madhya Pradesh : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील सुपर लीग फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. ८ वा सामना झारखंड आणि मध्य प्रदेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. शेवटी झारखंड संघाने हा सामना एका धावाने जिंकून दमदार विजयाची नोंद केली.
स्फोटक फलंदाज ईशान किशन या सामन्याचा हिरो ठरला.पुण्यात पार पडलेल्या या सामन्यात मध्य प्रदेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झारखंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ९ गडी बाद १८१ धावा केल्या. झारखंड संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना ईशान किशनने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. तर विराट सिंगने १४ धावा केल्या. कुशाग्राने ८, रॉबिन मिंझने १५ धावांची खेळी केली. तर अनुकूल रॉयने २९ धावा केल्या. ईशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर झारखंड संघाने १८१ धावांपर्यंत मजल मारली.
मध्य प्रदेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या हर्ष गवळीने ६१ धावांची तुफानी खेळी केली. तर वेंकटेश अय्यर अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना हरप्रीत सिंग भाटियाने ७७ धावा केल्या. तर कर्णधार रजत पाटीदारने १६ धावा केल्या.
शेवटच्या षटकात लागला सामन्याचा निकाल
धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाला हवी तशी सुरुवात मिळाली होती. पण शेवट हवा तसा करता आला नाही. शेवटच्या षटकात मध्य प्रदेश संघाला विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी रजत पाटीदार स्ट्राईकवर होता. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार खेचला. तर दुसरा चेंडू वाईड चेंडू होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रजत पाटीदार बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर पुढील २ चेंडूंवर अवघ्या ३ धावा झाल्या. मध्य प्रदेश संघाला चांगली सुरुवात मिळूनही १८० धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे हातात असलेला सामना मध्य प्रदेश संघाने अवघ्या एका धावेने गमावला.
