नागपूर : सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन संघ उपउपांत्यपूर्व लढतीत आमनेसामने येणार आहेत.

पाचही साखळी सामन्यात दमदार विजय संपादन करुन विदर्भाने दिमाखात बाद फेरीत धडक दिली आहे. विदर्भ आणि महाराष्ट्र हे दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजीमध्ये सक्षम असून कोण विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत धडक देणार याबद्दल उत्सुकता आहे. महाराष्ट्राला मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडची उणीव जाणवेल. ऋतुराज न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताकडून खेळणार आहे. त्यामुळे केदार जाधव, यश नाहर आणि कर्णधार नौशाद शेख यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त असेल. अक्षय वाडकरच्या नेतृत्वात प्लेट गटात खेळणाऱ्या विदर्भाने साखळी सामन्यात प्रशंसनीय कामगिरी केली. विजयावाडा येथील पाचही साखळी सामन्यांत विदर्भाने विजय नोंदवून सर्वाधिक २० गुणांसह गटात अव्वल स्थान प्राप्त करीत बाद फेरीत धडक दिली.