सात गडी राखून दणदणीत विजयासह विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : ऋतुराज गायकवाडची अनुपस्थिती महाराष्ट्राला महागात पडली. सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी—२० क्रिकेट स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व लढतीत विदर्भाने महाराष्ट्राला सात गडी आणि १३ चेंडू राखून पराभवाचा धक्का दिला.

महाराष्ट्राने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य विदर्भाने १७.५ षटकांत गाठून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. कर्णधार अक्षय वाडकर (नाबाद ५८ धावा) आणि सलामीवीर अथर्व तायडे (५६) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९६ धावांची भागीदारी रचत विदर्भाच्या विजयाचा पाया रचला. मग जितेश शर्माने अवघ्या ७ चेंडूंत २८ धावा फटकावून संघाचा विजय साकारला. आता गुरुवारी विदर्भाची राजस्थानशी गाठ पडणार आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ८ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली. यश ठाकूरच्या (३/१७) वेगवान माऱ्यासमोर महाराष्ट्राची फलंदाजी ढेपाळली. त्याला अक्षय कर्णेवारने (२/२५) उत्तम साथ दिली. ऋतुराजच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणारा नौशाद शेख (०), अनुभवी केदार जाधव (६), अझिम काझी (१५) अपयशी ठरले. मात्र दुखापतीून सावरत पुनरागमन करणाऱ्या राहुल त्रिपाठीने ४५ चेंडूंत ६६ धावांची खेळी साकारली. त्याने यश नाहरसह (२९) दुसऱ्या गडय़ासाठी ६४ धावांची भर घालून महाराष्ट्राला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ८ बाद १५७ (राहुल त्रिपाठी ६६, यश नाहर २९; यश ठाकूर ३/१७) पराभूत वि. विदर्भ : १७.५ षटकांत ३ बाद १६० (अक्षय वाडकर नाबाद ५८, अथर्व तायडे ५६, जितेश शर्मा नाबाद २८; मुकेश चौधरी १/२४)