चेहरा हरवलेली स्पर्धा!

भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही.

भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. त्यामुळेच ही स्पर्धा फक्त उरकण्यातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) धन्यता मानते. मुळात २००८पासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या नावाने फ्रेंचायझींवर आधारित ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू केल्यानंतर आणि काही वर्षांनंतर या स्पध्रेला देशातील स्थानिक स्पध्रेचा दर्जा दिल्यानंतर आणखी एका स्पध्रेची आवश्यकता होती का, हा प्रश्न ऐरणीवर आहे.
२००८-०९मध्ये पाच विभागांवर आधारित सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीला विभागीय पातळीवर आणि मग बाद फेरी असे त्याचे स्वरूप होते आणि त्यांच्या तारखाही स्वतंत्र असायच्या, परंतु गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा विभागीय साखळी आणि मग अव्वल साखळी स्वरूपात साकारण्यात आली. याचप्रमाणे त्यांच्या तारखाही सलग येतील, याची काळजी घेण्याचा प्रयत्न झाला. याच वर्षीचे उदाहरण घेतले तर आयपीएल स्पर्धा समोर असताना सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पध्रेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. पाचही विभागांमध्ये साखळी स्पध्रेचा बार मोठय़ा दिमाखात उडाला. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात समाविष्ट नसलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आपल्या स्थानिक संघांचे प्रतिनिधित्व करून बीसीसीआयच्या कर्तव्यांचे पालन केले. कारण तशा आशयाचा फतवाच बीसीसीआयने काढला होता. परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्याला कोण जागे करणार? कारण आता अव्वल साखळी स्पर्धा खेळण्यासाठी फारसे नावे असलेले क्रिकेटपटू उपलब्ध नाहीत. कारण संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तारखा जवळ आल्याने सर्व फ्रेंचायझींचे सरावसत्र सुरू होईल. मग बीसीसीआयने तारखा निश्चित करतानाच याची खबरदारी का घेतली नव्हती? त्यामुळे आयपीएल न खेळणाऱ्या नवख्या-उदयोन्मुख खेळाडूंच्या अव्वल साखळीचे सोपस्कार कशासाठी हे कळायला मार्ग नाही.
मुळात भारतीय क्रिकेटच्या वार्षिक कार्यक्रमाकडे पाहिल्यास आयपीएल, चॅम्पियन्स लीग आणि सय्यद मुश्ताक अली चषक अशा तीन स्पर्धा देशातील क्रिकेटपटूंना खेळायला मिळतात. म्हणजे सुमारे तीन महिने ट्वेन्टी-२०चा मोसम येथे बहरत असतो. पण हाच भारत कोणत्याही देशाविरुद्धच्या मालिकेत ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मात्र फारसा उत्सुक नसतो. आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली चषक या दोन ट्वेन्टी-२० स्पर्धा तशा बीसीसीआयच्याच. पण एका स्पध्रेला कुबेराचे वरदान, तर दुसरीला दारिद्रय़ाचा शाप. चकचकीतपणा जोपासणाऱ्या आयपीएलच्या हजारो रुपयांच्या तिकिटांसाठी क्रिकेटचाहत्यांची झुंबड उडते. परंतु मोफत असलेली सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा पाहायला मात्र ५०-१०० क्रिकेटरसिकही नसतात. गुरुवारी झालेल्या मुंबई-महाराष्ट्र सामन्याला सर्वाधिक ३००च्या आसपास चाहत्यांनी हजेरी लावली होती. या स्पध्रेला आकर्षित करण्यासाठी कोणताच विचार गांभीर्याने करण्यात आलेला नाही. या स्पध्रेचे थेट प्रक्षेपणही उपलब्ध नाही. आयपीएल, देशांतर्गत मालिका, विश्वचषक आणि अन्य स्पर्धाच्या प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी मोठी आर्थिक उलाढाल करणाऱ्या या वाहिनींवर स्थानिक स्पर्धाच्या प्रक्षेपणाची बंधने घालता आली असती.
या स्पर्धाचे विभागीय यजमानपद सांभाळणाऱ्या क्रिकेट असोसिएशन्सनी त्यात भर घालण्याचेच कार्य केल्याचे दिसून येते. वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार रिक्रिएशन सेंटरमधील मैदानावर पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे अध्रे सामने खेळवण्यात आले, ते केवळ मैदानाचे अधिकार जपण्यासाठी. उच्चभ्रूंसाठी साकारण्यात आलेल्या या रिक्रिएशन सेंटरचे अधिकार एमसीएला (नावापुरते?) मैदानापोटी मिळालेले आहेत आणि त्यामागे कोणती राजकीय शक्ती कार्यरत आहे, ते वेगळे सांगायची गरज नाही. परंतु पवारांच्या नावाने बांधण्यात आलेल्या या स्टेडियमवर सर्वसामान्य क्रिकेटरसिकांना, प्रसारमाध्यमांना, गुणलेखक-सांख्यिकी तज्ज्ञांना बसण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. याकडे मुंबई क्रिकेट असोसिएशन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे.
पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील पाच संघांचे गणवेश सुदैवाने विशिष्ट रंगांचे आहेत, परंतु त्यावर ना त्या खेळाडूंचे नाव आहे, ना संघांचे. याचप्रमाणे क्रमांकांचा त्यावर अभाव आहे. यापैकी सौराष्ट्रने खेळाडूंना क्रमांक दिले आहेत, तर गुजरातने टी-शर्ट्सवर नावे. पण बाकीच्या संघांना किंवा बीसीसीआयला याचे महत्त्व पटलेले दिसत नाही. तूर्तास, सट्टेबाजी आणि फिक्सिंगच्या वादळामुळे हेलकावे खाणारे बीसीसीआयचे गलबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आत्ता थोडेसे स्थिरावले आहे. बीसीसीआयच्या धुरिणांनी किंवा सध्या कारभार पाहणाऱ्या शिवलाल यादव आणि सुनील गावस्कर (आयपीएलपुरत्या) यांनीसुद्धा सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, चेहरा हरवलेली ट्वेन्टी-२० स्पर्धा एवढीच तिची ओळख शिल्लक राहील. पण किमान ही स्पर्धा पूर्णत: आयपीलच्या आधी घ्यावी, जेणेकरून तयारीची संधी मिळाली, हे तरी खेळाडूंना अभिमानाने सांगता येईल.
    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: T 20 cricket face lost competition