भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा कायम चर्चेचा विषय असतो. रविवारी झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत करत इतिहास रचला. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा सामना सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू राष्ट्रगीत चालू असताना गुडघ्यावर बसले होते. सामना सुरू होण्याआधी खेळाडू गुडघ्यावर बसून असल्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोवरुन नेटकऱ्यांमध्ये समर्थन देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडलेत.

दरम्यान, फोटो व्हायरल झाल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू गुडघ्यावर का बसले होते, असा प्रश्न देखील काहींना पडला होता. तर, जगभर सुरू असलेल्या ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी खेळाडू गुडघ्यावर बसले होते. अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधात ही चळवळ सुरू आहे. गेल्या वर्षी जॉर्ज फ्लाइडची हत्या झाल्यानंतर जगभरात या चळवळीने जोर धरला होता.

या चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने सांगितलं की, मॅनेजमेंट आम्हाला याबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर आम्ही गुडघ्यांवर बसून आदरांजली वाहिली. तर पाकिस्तान संघाने देखील सामना सुरू होण्यापूर्वी आदरांजली वाहिली.

काय आहे ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ चळवळ?

अमेरिकेतील Black Lives Matter ही राजकीय चळवळ आहे. कृष्णवर्णीय अमेरिकन जॉर्ज फ्लाइडचा बनावट नोटांप्रकरणी पोलीस कर्मचारी डेरेकने फ्लाइडच्या गळा गुडघ्याने ९ मिनिटं दाबून धरला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधात ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ ही चळवळ सुरू झाली होती. जॉर्जच्या हत्येनंतर संपूर्ण जगात याचे पडसाद उमटले होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडिओत जॉर्ज श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं वारंवार सांगत होता. मात्र डेरेकने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा जीव गेला होता.