आयसीसी विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान २४ ऑक्टोबर रोजी एकमेकांविरुद्ध समोर येणार आहेत. दोन्ही संघांनी सोमवारी आपापले सराव सामने खेळले. दुबईतील आयसीसीच्या मैदानावर दोन्ही सामने झाले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला आणि भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना समान फरकाने जिंकला. पाकिस्तानचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनपासून खेळवला गेला, तर भारताचा सामना सायंकाळी साडेसात वाजला खेळला गेला. जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता, तेव्हा भारतीय संघातील काही खेळाडू त्याची फलंदाजी पाहताना दिसले.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये दाखवण्यात आले आणि या दरम्यानचे स्क्रीनशॉट पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता, तेव्हा भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी त्याची फलंदाजी पाहताना दिसले.

वेस्ट इंडीजविरुद्ध, पाकिस्तानने चांगली कामगिरी करत टी -२० वर्ल्ड कपसाठी मजबूत तयारीचा पुरावा दिला. वेस्ट इंडिजला पाकिस्तानने २० षटकांत सात गडी बाद करत १३० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १५.३ षटकांत तीन गडी गमावून लक्ष गाठले. बाबर आझमने ४१ चेंडूत ५० धावा केल्या. याशिवाय फखर जमानने नाबाद ४६ धावा केल्या. फखर जमानने २४ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार मारले.

गोलंदाजीमध्ये पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, हसन अली आणि हॅरिस रौफने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर इमाद वसीमने एक विकेट घेतली. हॅरिस आणि शाहीन आफ्रिदी वगळता एकाही पाकिस्तानी गोलंदाजाने ५.२ पेक्षा जास्त धावा इकॉनॉमी रेटवर खर्च केल्या नाहीत. भारतासोबतच्या सराव सामन्यात इंग्लंडने २० षटकांत पाच गडी बाद १८८ धावा केल्या.  प्रत्युत्तरात भारताने १९ षटकात तीन गडी गमावून १९२ धावा करून सामना जिंकला.