India Fileding Coach on Rohit Sharma: २०२३ चा वनडे विश्वचषक आणि प्रत्येक सामन्यानंतर मिळणारं फिल्डिंग मेडल हे जणू एक समीकरण झालं होतं. तेव्हापासून प्रत्येक सामन्यानंतर, मालिकेनंतर बीसीसीआयच्या सोशल मीडिया पेजवर हा व्हिडीओ कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. या व्हिडीओमध्ये आज कोणत्या नव्या पद्धतीने फिल्डिंग मेडलचा विजेता जाहीर होणार, यावरही सर्वांच्या नजरा असायच्या. पण ही फिल्डिंग मेडलची संकल्पना कुठून आली, याचा खुलासा भारतीय संघाचे माजी फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी केला.

भारतीय क्रिकेटमध्ये ‘फिल्डिंग मेडल’ ही संकल्पना आता संघातील खास परंपरा बनली आहे. प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या या पदकामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणही उत्साही झालं आहे. हे मेडल देण्याची कल्पना तत्कालीन फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी २०२२-२३मध्ये मांडली होती. मात्र, या कल्पनेला आकार देण्यात रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचाही महत्त्वाचा वाटा होता, ही बाब फारशी समोर आलेली नव्हती.

टी. दिलीप यांनी रेवस्पोर्ट्जला दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण कल्पनेमागची कहाणी सांगितली. ते म्हणाले, “२०२२ मधील आशिया चषकामध्ये एकामागून एक सामने होते. फिल्डिंग स्टँडर्ड्समध्ये संघ त्यावेळेस थोडा मागे पडला होता. त्यानंतर दोन दिवसांनी सारख्याच मैदानावर वेगळ्या संघासमोर संघाने कमालीची फिल्डिंग केली होती. मी प्रत्येक सामन्याचं बारीक निरीक्षण आणि विश्लेषण करायचो. त्यामुळे फिल्डिंगमधील विसंगतता जी होती, त्यावर विचारचक्र सुरू होतं. हे फिल्डिंग मेडल सुरू करण्यामागचा विचार हाच होता की संघातील खेळाडूंना कळावं की छोट्या गोष्टीचा इम्पॅक्ट संघासाठी खूप मोठा असतो.

टी दिलीप पुढे म्हणाले, आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सुरू केलेली ही संकल्पना एवढ्या मोठ्या स्तरावर सर्वांना आवडेल असं वाटलं नव्हतं. पण खेळाडूंना याचं खरं क्रेडिट जातं, त्यांनी ते सर्व एन्जॉय केलं आणि मुळात त्यांनी त्या मेडलला तितका मान दिला. मी रोहित शर्मा व राहुल द्रविड यांचे विशेष आभार मानतो,जेव्हा त्यांनी हा विचार ऐकला तेव्हा त्यांनी या उपक्रमासाठी पूर्ण स्वातंत्र्य देत मला पाठिंबा दिला.

टीम इंडियात फिल्डिंग मेडल आणण्याचं क्रेडिट रोहित शर्माला

टी दिलीप यांनी रोहित शर्माबरोबर केल्याचा चर्चा खुलासा करताना सांगितलं, आशिया कपदरम्यान माझ्या मनात ही कल्पना आली होती. मी नाश्त्याच्या वेळी कर्णधार रोहित शर्मासमोर ती मांडली. सुरुवातीला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांसाठी पदकं देण्याचा माझा विचार होता.” मात्र, रोहितने या कल्पनेत महत्त्वाचा बदल सुचवला. दिलीप यांच्या म्हणण्यानुसार, “रोहितने सांगितलं की फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराच्या माध्यमातून नेहमीच कौतुक होतं. त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी काहीतरी वेगळं करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आम्ही फिल्डिंग मेडलवर शिक्कामोर्तब केलं.”

यानंतर ही कल्पना तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर मांडण्यात आली. द्रविड यांनीही या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला. “राहुल भाई नेहमीच टीम फर्स्ट या विचाराने काम करायचे आणि ही कल्पना त्यांच्या दृष्टिकोनाशी अगदी जुळणारी होती,” असं दिलीप यांनी सांगितलं.

सुरुवातीला हे मेडल इतकं लोकप्रिय होईल, याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, BCCIच्या मीडिया टीमने मेडल देतानाचे क्षण अतिशय सुंदर पद्धतीने रेकॉर्ड करून दाखवले आणि त्यानंतर या उपक्रमाला वेगळीच ओळख मिळाली. आता भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू या मेडलची आतुरतेने वाट पाहतो.