टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघासाठी सध्या करो या मरो स्थिती आहे. टीम इंडियाने गट टप्प्यातील सर्व चारही सामने जिंकत सुपर-८ मध्ये धडक मारली. पण सुपर-८ मधील दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात संघाला ७६ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताला गुणतालिकेतील नेट रन रेटमध्ये मोठा फटका बसला. इतकंच काय तर भारताच्या गटातील वेस्ट इंडिजने झिम्बाब्वे संघाला १०७ धावांनी पराभूत केलं, त्यामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनलच्या आशांना अजून धक्का बसला. पण भारताबरोबर सध्या २००७ च्या विश्वचषकाप्रमाणे यंदा योगायोग घडत आहे.

भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार की नाही, यासाठी भारतीय चाहते सध्या चिंतेत आहेत. पण २००७ च्या विश्वचषकाप्रमाणेच एक अनोखा योगायोग सध्या जुळून येत आहे. टी-२० विश्वचषक २००७ मध्ये पहिल्यांदा खेळवला गेला, या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं.

२००७ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं, तेव्हाही यंदा जशा घटना घडत आहेत, नेमक्या तशाच घटना घडत होत्या. २००७ च्या गट टप्प्यात भारताने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता. त्यानंतर २००७ मध्ये सुपर-८ मधील पहिला सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळवला गेला होता, या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर २००७ मध्ये टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं आणि जेतेपदाला गवसणी घातली.

२०२६ मध्ये भारताने गट टप्प्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर सुपर-८मधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. २००७ प्रमाणेच हा अजब योगायोग यंदाही जुळून आला आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया दमदार पुनरागमन करत जेतेपदाला गवसणी घालणार काय यावर सर्वांच्या नजरा आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभवानंतर भारताचा नेट रन रेट वजा ३.८० आहे. त्यामुळे संघाला जर नेट रन रेट वाढवायचा असेल तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरूद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. भारताला उर्वरित दोन सामने फक्त जिंकून चालणार नाही, तर त्यांना मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दोन्ही संघांचा पराभव करावा, अशी प्रार्थनाही टीम इंडियाला करावी लागेल.