टी २० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरची बॅट चांगली तळपली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात डेविड वॉर्नरने अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतील त्याचं दुसरं अर्धशतक आहे. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी डेविड वॉर्नरच्या फॉर्माबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आयपीएल २०२१ स्पर्धेत तर डेविड वॉर्नरच्या खराब फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती. त्यामुळे त्याला हैदराबादचं कर्णधारपदही सोडावं लागलं होतं. तसेच शेवटच्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलमधील शेवटचे सामने डेविड वॉर्नरने प्रेक्षक गॅलरीत बसून पाहिले.

आयपीएलनंतर वर्ल्डकप सामने सुरू झाले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. या सामन्यात डेविड वॉर्नर सलामीला आला होता. मात्र १५ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने जोरदार कमबॅक केलं. ४२ चेंडूत ६५ धावा केल्या. या खेळीत १० चौकारांचा समावेश होता. त्यानंतर जबरदस्त फॉर्मात असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अवघी १ धाव करून तंबूत परतला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील सामने यूएईमध्ये खेळले गेले. मात्र यादरम्यान डेव्हिड वॉर्नरला केवळ २ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ६ सामन्यांत तो संघाबाहेर होता. ”हे माझ्यासाठी कठीण दिवस होते. मला का बाहेर फेकले गेले हे माझ्यासाठी अनाकलनीय असले तरी.” असं डेविड वॉर्नरने सांगितलं होतं.