टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यात उपांत्य फेरीत जाण्याचा मार्गही खडतर झाला आहे. वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीला आयपीएलला दोषी धरलं जात आहे. सोशल मीडियावर हॅशटॅग BanIPL ट्रेंड होत आहे. यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर मैदानात उतरला आहे. त्याने टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच आयपीएलमधून खेळाडूंचा सराव होत असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही आयपीएलला दोषी ठरवू शकत नाहीत. भारतीय क्रिकेटमध्ये काही चुकीचं घडलं, तर प्रत्येक जण आयपीएलवर बोटं उचलतं. हे चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला मान्य करावं लागेल दोन-तीन टीम आपल्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळत आहेत. जितक्या लवकर आपण स्वीकार करू, तितकं चांगलं राहिल.”, असं गौतम गंभीर यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं. “न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपण दडपणाखाली असल्याचं दिसलं. आपण सामन्यापूर्वीच आत्मविश्वास गमावला होता. याचा आयपीएलशी काही देणं घेणं नाही. २०१९ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतही असंच झालं होतं. त्या वेळेसही आयपीएलनंतर वर्ल्डकप खेळलो होतो. आयपीएल महत्त्वपूर्ण आहे कारण खेळाडूंना पर्याप्त सरावाची गरज असते. आपण २-३ सामन्यांचा अभ्यास करून वर्ल्डकप खेळू शकत नाही”, असंही गौतम गंभीर यांनी पुढे सांगितलं.

१४ वर्षानंतर सेहवागचा खुलासा..! २००७ वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीसाठी ‘या’ व्यक्तीला धरलं जबाबदार

सलग दोन पराभव पत्करल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ असंख्य आव्हानांना सामोरे जात आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास भारताला सर्वप्रथम बुधवारी अफगाणिस्तानची खिंड जिंकावी लागेल. अबू धाबी येथे अव्वल-१२ फेरीतील लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. भारताच्या संघनिवडीकडेही सर्वांचे लक्ष राहणार असून अफगाणिस्तानने यापूर्वी आपल्याला अनेकदा कडवी झुंज दिली असल्याने चाहत्यांना रंगतदार सामना पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc gautam gambhir on ban ipl trend rmt
First published on: 03-11-2021 at 16:54 IST