टी २० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने भारताची गाडी रुळावरून घसरली आहे. दोन सलग पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली नाणेफेकीचा कौल हरल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे मैदानात पडत असलेल्या दवबिंदूमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं अवघड जात आहे. अशातच आता फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी कमी धावसंख्येसाठी खेळपट्ट्यांना जबाबदार धरलं आहे. दुबईतील खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणं सोपं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

“अशा खेळपट्ट्यांवर पहिली फलंदाजी करणं सोपं नाही. ज्या संघांनी पहिली फलंदाजी केली, त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. आम्ही मोठे फटके मारण्यात अपयशी ठरलो. पण खेळपट्ट्याही तितक्याच जबाबदार आहेत”, असं विक्रम राठोर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ६ व्या षटकापासून १५ षटकापर्यंत चौकार मारण्यात भारतीय संघ अपयशी ठरला. तसेच स्ट्राईक बदलण्यातही खेळाडू झगडताना दिसले. “न्यूझीलंडविरुद्ध खेळताना मधल्या षटकात स्ट्राईक बदलण्यास अडचणी येत होत्या. मी असं सांगत नाही की, आमच्या संघाला अडचणी आल्या. सर्वच संघांच्या बाबतीत हे पाहायला मिळत आहे.”, असंही राठोर यांनी पुढे सांगितलं.

ऐकलं का..? विराटनंतर रोहित नव्हे, तर ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कप्तान!

विराटने यापूर्वीच टी-२० विश्वचषकानंतर आपण टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केलीय. द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने देदीप्यमान यश मिळवले. परंतु ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये संघाला जेतेपद मिळवून देण्यात तो अपयशी ठरत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याने गोलंदाजीत केलेले बदल आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अनाकलनीय होती. नाणेफेकीचा कौलही कोहलीची साथ देत नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.