टी -२० विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुमारे २८ महिन्यांनंतर दोन्ही संघ समोरासमोर असतील. दोन्ही संघ शेवटच्या वेळी २०१९ च्या विश्वचषकात भेटले होते. त्यामुळे या सामन्यावर संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आयसीसीला या सामन्यातून मोठ्या प्रमाणात कमाई करते. प्रायोजकांपासून टीव्ही जाहिरातींपर्यंत अनेकजण भरपूर पैसा कमावतात. पण भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना सामना खेळण्यासाठी किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या तुलनेत पाकीस्तानच्या खेळाडूंची खराब परिस्थिती आहे. 

माजी कसोटीपटू आकाश चोप्राला पाकिस्तानी खेळाडूंचे वेतन खूपच कमी असल्याबद्दल वाईट वाटले. आकाश चोप्रा यांनी पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांना देशाची अर्थव्यवस्था कशी वाढवायची याबाबत सूचना दिल्या. 

पाकिस्तानच्या केंद्रीय करारानुसार खेळाडूंचे तीन ग्रेड आहेत. प्रथम श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ४६ लाख रुपये दिले जातात. दुसरीकडे ब श्रेणीतील खेळाडूंना फक्त २८ लाख रुपये मिळतात. क श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी फक्त १९ लाख रुपये दिले जातात. 

कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना खूप कमी पैसे मिळतात. पाकिस्तानी खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी ३.६ लाख रुपये आणि एकदिवसीय सामन्यासाठी २.२ लाख रुपये दिले जातात. टी -२० सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना १.६ लाख रुपये दिले जातात. पाकिस्तानी खेळाडूंना दिलेल्या बोनसच्या रकमेची कोणतीही माहिती नाही. ही सर्व माहिती आकाश चोप्रा यांनी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये दिली आहे.

दुसरीकडे, भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा कितीतरी अधिक कमावतात. भारतात, ग्रेड अ+ खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये दिले जातात. ग्रेड अ खेळाडूंना वर्षाला ५ कोटी, ब गटातील खेळाडूंना ३ कोटी आणि क गटातील खेळाडूंना १ कोटी दिले जातात. कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना १५ लाख रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे वनडे खेळण्यासाठी ६ लाख रुपये आणि टी -२० खेळण्यासाठी ३ लाख रुपये दिले जातात.