टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार आहे. सुपर १२ फेरीत न्यूझीलंडला पाकिस्तानने मात दिली होती. तर इतर सामन्यात न्यूझीलंडची कामगिरी चांगली राहिली आहे. दुसरीकडे, भारताचं उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर आयपीएलला दोष दिला जात आहे. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने आयपीएलमुळे न्यूझीलंडला फायदा झाल्याचं सांगितलं आहे. आयपीएलमुळे यूएईतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्यात मदत झाली. “आम्हाला सुरुवातीला वाटलं की आशियाई संघांना फायदा होईल. मात्र आयपीएल खेळल्याने आम्हाला जाणीव झाली हे अंतर जास्त नाही”, असं केन विलियमसननं सांगितलं.

“आयपीएल आणि फ्रेंचाइसी संघांच्या शिबिरात सर्व देशांच्या खेळाडूंना इथल्या परिस्थिचा अंदाज घेता आला. त्यामुळे मदतच झाली. कोणताही संघ कुणालाही हरवू शकतो, हे स्पर्धेत पाहिलं. काही संघांना विजयी संघ म्हणून सुरुवातीला पाहिलं गेलं. पण सामन्याच्या दिवशी आम्हाला नशिबाने साथ दिली. आम्ही स्वत:ला नशिबवान समजतो. आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. असाच खेळ आम्ही पुढेही सुरूच ठेवू.”, असं केन विलियमसननं सांगितलं.केन विलियमसननं वेगवान गोलंदाजी ट्रेन्ट बोल्ट आणि टीम साउथीचं कौतुक केलं. मागच्या काही वर्षात न्यूझीलंडला यशस्वी करण्यात ट्रेन्ट आणि साउथीने प्रमुख भूमिका बजावली आहे, असं केन विलियमसन यांनी सांगितलं.

IPL 2022: आरसीबी संघाला मिळाला नवा हेड कोच; ट्वीट करत केली घोषणा

टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे. स्पर्धेतील इंग्लंड संघाचा कामगिरी पाहता पारडं जड मानलं जात आहे. दोन्ही संघांनी सुपर १२ फेरीत प्रत्येकी ४ सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड २०१९ वर्ल्डकपमध्ये आमनेसामने आली होती. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत किताब जिंकला होता. दोन वेळा हा सामना अनिर्णित ठरला होता. त्यानंतर चौकाराच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं.