टी २० वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारताच्या सलामीच्या फलंदाजांना सूर गवसला आहे. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि केएल राहुल जोडीने विक्रमी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४ षटकं आणि ४ चेंडूत १४० धावा केल्या. तसेच भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. केएल राहुलने ४८ चेंडूत ६९ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. तर रोहित शर्माने ४७ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये या जोडीची चौथी शतकी भागीदारी आहे. यासह त्यांनी दुसऱ्या नंबरवर असलेल्या जोडीची बरोबरी केली आहे. विशेष म्हण्जे दोन्ही जागेवर रोहित शर्माचं नाव आहे. रोहित शर्माने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी केली होती.

  • बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- ५ वेळा
  • रोहित शर्मा आणि शिखर धवन (भारत)- ४ वेळा
  • मार्टिन गुप्टिल आणि केन विलियमसन (न्यूझीलंड)- ४ वेळा
  • रोहित शर्मा आणि केएल राहुल (भारत)- ४ वेळा

रोहित शर्माने वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक ५० हून अधिक धावा करण्याऱ्या श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने टी २० विश्वचषकात सात वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने १० वेळा आणि ख्रिस गेलने ९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत.