टी २० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँड विरुद्धच्या सामन्यात नामिबियाने विजय मिळवला. स्कॉटलँडने नामिबियासमोर विजयासाठी ११० धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान नामिबियाने ४ गडी आणि ५ चेंडू राखून पूर्ण केलं. स्कॉटलँडला कमी धावांवर रोखण्यात नामिबियाला यश आलं त्यामुळे विजय खेचून आणता आला.
नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात तीन धक्के देत स्कॉटलँडवर दबाव आणला. रुबेन ट्रंपलमॅननं पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्कॉटलँडच्या जॉर्ज मुनसेला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कॅलम मॅकल्योड फलंदाजीसाठी आला. त्याला गोलंदाजी करताना वाईड चेंडू टाकला. त्यानंतर दुसरा चेंडू टाकताना निर्धाव राहिला. तिसऱ्या चेंडूवर कॅल मॅकल्योडला बाद केलं. झेन ग्रीननं त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी रिची बेरिंगटॉन आला. मात्र रुबेनच्या भेदक गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. रुबनने या सामन्यात ४ षटकं टाकत १७ धावा देत ३ गडी बाद केले. त्यानंतर मिशेल लिक्सने ४४ धावा केल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
नामिबियाने स्कॉटलँडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. मात्र संघाच्या २८ धावा असताना लिंगेन बाद झाला. त्यानंतर झेन ग्रीनही जास्त काळ तग धरू शकला नाही. त्यानंतर इरास्मुस आणि विलियम्स झटपट बाद झाले. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. मात्र स्मिथने एक बाजू सावरत २३ चेंडूत नाबद ३२ धावा केल्या. या खेळीमुळे विजय साकारता आला.