टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने धडक मारली आहे. पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान ५ गडी आणि १ षटक राखून पूर्ण केलं. या विजयात जिम्मी निशमचा मोलाचा वाटा होता. त्याने ११ चेंडूत २७ धावांची खेळी केली. या खेळीत १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. हा सामना जिंकताच न्यूझीलंडच्या खेळाडूंनी डगआउटमध्ये एकच जल्लोष केला. मात्र निशम एकदम शांत होता. आपल्या खुर्चीवरून जराही उठला नाही. पॅड बांधून पाय पसरवून एकाच स्थितीत बसला होता. निशमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मात्र यामागचं कारण जिम्मी निशम यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काम संपलं का?, मला वाटत नाही”, असं ट्वीट जिम्मी निशमने केलं आहे. या ट्वीटमधून निशमचा इशारा अंतिम सामन्याकडे असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनेही जल्लोष केला नाही. मात्र चेहऱ्यावर हसू होते. न्यूझीलंडने २०१५ आणि २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं.. २०१९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने स्वप्न भंगलं होतं.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपचा अंतिम सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सुपर ओव्हर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे आणखी एक सुपर ओव्हर करण्याच निर्णय झाला. मात्र ही सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली आणि इंग्लंडला चौकारांच्या मदतीने विजयी घोषित करण्यात आलं. २०१९ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पराभव, २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजय आणि आता टी २० वर्ल्डकपची अंतिम फेरीत प्रवेश असा प्रवास गेल्या दोन वर्षात न्यूझीलंड संघाने केला आहे. रविवारी टी २० वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्यास एका वर्षात दोन आयसीसी स्पर्धा जिंकण्याची अनोखी संधी असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc new zealand celebrated after defeat england james neesham was quiet rmt
First published on: 11-11-2021 at 16:25 IST