टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत पाकिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. भारतानंतर न्यूझीलंडला पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर भारत आणि न्यूझीलंडला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढचे सामने जिंकणं गरजेचं आहे. ३१ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. संघाचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टिलला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामना खेळण्याबाबत साशंकता आहे.

“आम्ही त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत. बघूया त्याला पुढच्या २४ ते ४८ तास कसं वाटतं. त्यावरून त्याची जखम किती गंभीर आहे, याचा निष्कर्ष काढता येईल. सध्यातरी त्याला दुखापत खूप जाणवत आहे.”, असं न्यूझीलंडने मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सामना संपल्यानंतर सांगितलं. यापूर्वी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर गेला आहे. फर्ग्युसननंतर एडम मिल्नेला संघात सहभागी केलं आहे. मात्र मिल्नेला आयसीसीच्या तांत्रिक समितीकडून उशिराने मंजुरी मिळाल्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.

भारताने यापूर्वी २००७ मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं आहे. मात्र न्यूझीलंडचा संघ अद्याप एकदाही स्पर्धा जिंकलेला नाही. मात्र टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. २०१६ मध्ये नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पराभव केला होता.