टी २० वर्ल्डकपमधील सुपर १२ फेरीत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टनं खास रणनिती आखली आहे. बोल्टने यापूर्वी अनेकदा भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ केली आहे. २०१९ च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीतही कर्णधार विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला होता. तर वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद केलं होतं. २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचं लक्ष्य गाठताना भारतीय संघाच्या पाच धावांवर तीन गडी बाद झाले होते.

पाकिस्ताननं ज्या पद्धतीने भारताला पराभूत केलं, तशीच व्यूहरचना आखल्याचं ट्रेन्ट बोल्टने सांगितलं आहे. “भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात डावखुऱ्या शाहीनची गोलंदाजी पाहून खूप छान वाटलं. माझा चेंडूही स्विंग होतो. त्यामुळे शाहीनने जे केलं तेच मी करू शकतो.”, असं ट्रेन्ट बोल्टने सांगितलं. “भारतीय संघात चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला गोलंदाजी करताना सुरुवातीला गडी बाद करणं गरजेचं आहे.” असंही ट्रेन्ट बोल्टने सांगितलं. “न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानविरुद्ध आम्ही चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरलो. पाकिस्तानचा संघ चांगलं क्रिकेट खेळत आहे.”, असंही ट्रेन्ट बोल्टने सांगितलं.

“मी असं सांगत नाही की, आमची बाजू भक्कम आहे. दोन्ही संघात चांगले खेळाडू आहेत. काही खेळाडूंनी आयपीएल खेळली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. आम्हाला आशा आहे की, आम्ही चांगली कामगिरी करू.”, असं ट्रेन्ट बोल्टने पुढे सांगितलं. तसेच संघाचा सलामीचा फलंदाज मार्टिन गुप्टिल फिट असल्याचंही सांगितलं.