टी २० वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताला १० गडी राखून पराभूत केलं. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय आहे. यामुळे पाकिस्तान संघात आनंदाचं वातावरण आहे. पाकिस्तानी खेळाडू आणि चाहत्यांनी मैदानात आनंद साजरा केला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही खेळाडूंनी जल्लोष केला. मात्र पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याने संघ सदस्यांना कानमंत्र दिला. या यशाने हुरळून न जाता आपल्याला वर्ल्डकप जिंकायचं आहे, असा सल्ला दिला.

“आपण संघ म्हणून जिंकलो आहोत. ही बाब आपल्याला सोडायची नाही. ही फक्त सुरुवात आहे. आनंद साजरा करा, पण अतिउत्साही होऊ नका. उद्याचा दिवस पण आपण आनंद साजरा करत राहू, तर हे लक्षात ठेवा पुढेही आपले सामने आहेत. आपल्याला पुढे लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. हा सामना झाला. आता आपलं ध्येय एकच आहे, वर्ल्डकप जिंकणं. आपल्याला शांत बसून चालणार नाही. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सर्वांनी १०० टक्के द्या. संघ म्हणून आज आपण जिंकलो आहोत. अतिउत्साही होऊ नका, ही विनंती तुम्हाला करतो.”, असं बाबर आझमने ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना सांगितलं.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं.