टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला नमवत इतिहास रचला आहे. पाकिस्तानने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला. २९ वर्षानंतर पाकिस्ताननं भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत केलं आहे. यापूर्वी भारत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून कधीही पराभूत झाला नव्हता. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत केल्याने गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या ‘मौका-मौका’ जाहिरातीचा गाशा गुंडळावा लागणार आहे. वर्ल्डकपच्या रेकॉर्डवर ही खास जाहिरात तयार करण्यात आली होती.२०१५ वर्ल्डकपपासून मौका-मौका जाहिरात चर्चे होती. भारत पाकिस्तान यांच्यात टी २० वर्ल्डकप आणि एकदिवसीय वर्ल्डकप सामने झाले. तेव्हा तेव्हा मौका-मौकाची नवी जाहिरात समोर आली होती. या जाहिरातींना क्रीडाप्रेमींनी पसंती दिली होती. मात्र आता असा ‘मौका’ पुन्हा मिळणार नाही, कारण पाकिस्तानने विजय मिळवला आहे.

पाकिस्तानने भारताला पराभूत करताच आता प्रत्युत्तरात एक जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीत भारताच्या पराभवानंतर भारतीय चाहते निराश दिसत आहेत. मात्र पाकिस्तानचे चाहते पुढे येत अश्रू पुसण्यासाठी टिश्यू देतात. ही जाहिरात २०१७ चॅम्पियन ट्रॉफीवेळी तयार करण्यात आली होती. आता ही जाहिरात पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं