टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवणारी पाकिस्तान हा पहिला संघ आहे. पाकिस्तानच्या कामगिरीमुळे सध्या पाकिस्तानी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बाबर आझमसह सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे २००९ इतिहासाची पुनरावृत्ती होईल, अशी आशा पाकिस्तानी चाहत्यांना आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात खेळाडू आपल्या जर्सी नंबरमागची गोष्ट सांगताना दिसत आहेत. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, फखर जमा, शादाब खान आणि शोएब मलिकने आपल्या जर्सी मागची गोष्ट सांगितली आहे.

बाबर आझम टी २० वर्ल्डकपमध्ये ५६ नंबरची जर्सी घालतो. “सर्वांना माहिती आहे, माझा जर्सी नंबर ५६ आहे. यामागे काही खास नाही. मला सुरुवातीला ३३ आणि ५६ मधून एक नंबर निवडण्यास सांगितलं. तेव्हा मी ५६ नंबर निवडला. तेव्हापासून मी या नंबरसोबत खेळत आहे. नंबरला माझ्या दृष्टीने काहीच अर्थ नाही. मात्र आता माझा एक भाग बनला आहे. आता मी नंबरला साजेशी कामगिरी करत आहे. त्यावर मला गर्व आहे.”, असं बाबर आझमने सांगितलं. बाबर आझमसोबत सलामीला येणाऱ्या मोहम्मद रिझवानेही आपल्या जर्सी नंबरबद्दल सांगितलं. “माझा जर्सी नंबर १६ आहे. मी जेव्हा खेळायला सुरुवात केली. तेवाह मी पहिल्यांदा १६ धावा केल्या होता. या व्यतिरिक्त ६ अंक माझ्या पत्नी आणि मुलींचा वाढदिवस या दिवशी येतो”, असं रिझवानने सांगितलं. लेग स्पिनर शादाब खानन आपल्या जर्सीचा २९ नंबर बदलून ७ केला आहे. कारण त्याचं ७ या क्रमांकावर विशेष प्रेम आहे.

शाहीन आफ्रिदीने सांगितलं की, “सुरुवातीला मला ४० नंबरची जर्सी दिली गेली. माझा रोल मॉडेल शाहिद आफ्रिदी आहे. माझं स्वप्न नेहमीच १० नंबरची जर्सी घालण्याचं होतं”. शाहिन आफ्रिदी या वर्ल्डकपमध्ये १० नंबरची जर्सी घालून खेळत आहे. फखर जमानेही आपल्या जर्सीमागची गोष्ट सांगितली. “पाकिस्तानी नौदलाशी संबंध असल्याने मी ३९ नंबर निवडला. नौदलात असताना माझ्या रुमचा नंबर ३९ होता. या नंबरशी माझं घट्ट नातं आहे”, असं फखर जमाने सांगितलं. शोएब मलिकने १९९९ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर १८ नंबरची जर्सी परिधान केली होती. त्यानंतर त्याने आपल्या जर्सीचा नंबर बदलला होता. आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या १८ नंबरसह टी २० वर्ल्डकपमध्ये खेळत आहे.