टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं स्कॉटलंडवर ७२ धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं विजयासाठी १९० धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्ताननं २० षटकात ४ गडी गमवून १८९ धावा केल्या होत्या. स्कॉटलंडचा संघ २० षटकात ६ गडी गमवून ११७ धावाच करू शकला. आता पाकिस्तानचा उपांत्य फेरीत सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

स्कॉटलंडचा डाव
पाकिस्तानने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या खेळाडूंचा पुरता दम निघाला. कायल कोएत्झल ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला मॅथ्यू क्रॉसही जास्त काळ तग धरू शकला नाही. ८ चेंडूत ५ धावा करून तंबूत परतला. जॉर्ज मुनसेही ३१ चेंडू खेळून फक्त १७ केल्या. शादाब खानच्या गोलंदाजीवर हरिस रौफने त्याचा झेल घेतला. डायलन बजला आपलं खातंही खोलता आलं नाही. मायकल लीक्स १४ चेंडूत १४ धावा करून माघारी परतला. शाहीन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडवला. ख्रिस ग्रीव्ह्स १२ चेंडूत ४ धावा करून हरिस रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

पाकिस्तानचा डाव
सलामीला आलेल्या मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोहम्मद रिझवान हमजा ताहीरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १९ चेंडूत १५ धावा केल्या. या खेळीत एका षटकाराचा समावेश आहे. फखर झमानच्या रुपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. ख्रिस ग्रीव्ह्सच्या गोलंदाजीवर मायकल लीक्सने त्याचा झेल घेतला. मोहम्मद हफीज १९ चेंडूत ३१ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारत आक्रमक फलंदाजी केली. मात्र सफयान शरिफच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कर्णधारपदाला साजेशी खेळी करून बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

पाकिस्तानचा संघ- बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर झमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, असिफ अली, शादाब खान, इमाद वासिम, हसन अली, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी

स्कॉटलंडचा संघ- जॉर्ज मुनसे, कायए कोएत्झर, डायलन बड्ज, रिची बेरिंगटोन, मायकल लीक्स, मॅथ्यू क्रॉस, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वॅट, साफयान शरिफ, हमजा ताहिर, ब्रॅड व्हिल