टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यात स्कॉटलँडने ओमानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ओमनचा संघ २० षटकात सर्वबाद १२२ धावा करू शकला. ओमाननं स्कॉटलँडला विजयासाठी १२३ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान स्कॉटलँडने १७ षटकात २ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह स्कॉटलँड आणि बांगलादेशने सुपर १२ मध्ये एन्ट्री मारली आहे.

स्कॉटलँडचा डाव

ओमानने दिलेल्या १२३ धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या जॉर्ज मुनसे आणि काइल कोएत्झर या जोडीने सावध सुरुवात करून दिली. मात्र फायाज बटच्या गोलंदाजीवर उंच फटका मारण्याच्या नादात जॉर्ज २० धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार काइल कोएत्झर ४१ धावा करून बाद झाला. तिथपर्यंत संघावरील दडपण बऱ्यापैकी दूर झालं होतं. तिसऱ्या गड्यासाठी मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंगटॉन यांनी विजयी भागीदारी केली.

ओमानचा डाव

ओमानला सुरुवातील जतिंदर सिंगच्या रुपाने पहिला धक्का बसला. मार्क वाटने त्याला धावचीत केलं. त्यानंतर लगेचच कश्यप हरिशभाई बाद झाला. त्यामुळे अडचणीत आलेल्या संघाला अकिब ल्ल्यास आणि मोहम्मद नदीम जोडीने सावरलं. त्यानंतर झीशान मकसूदनं ३४ धावा करत त्यात भर घातली. मात्र या तीन खेळाडूंव्यतिरिक्त एकही खेळाडू मैदानात तग धरू शकला नाही. संदीप गौड(५), नसीम खुशी(२), सुरज कुमार(४), फयाज बट(७), बिलाल खान(१) अशा धावा करत तंबूत परतले. स्कॉटलँडकडून जोश डॅवेने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

ओमानचा संघ- अकिब ल्ल्यास, जतिंदर सिंग, कश्यप हरिशभाई, मोहम्मद नदीम, झीशान मकसूद, संदीप गौड, नसीम खुशी, सुरज कुमार,फय्याज बट, बिलाल खान, खावर अली

स्कॉटलँडचा संघ- जॉर्ज मुनसे, काइल कोएत्झर, मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंगटॉन, कलूम मॅकलोड, मिशेल लिक्स, ख्रिस ग्रीव्ह्स, मार्क वाट, जोश डॅवे, सफयान शरीफ, ब्रॅड व्हिल