टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघ चांगल्या फॉर्मात दिसत आहे. ग्रुप २ चा भाग असलेल्या पाकिस्तान संघाने स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. या तीन विजयांसह, संघ ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारतावर १० विकेट्सने मात केली होती. यानंतर न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव केला आणि नुकताच अफगाणिस्तानचाही त्यांनी ५ विकेट्सने पराभव केला. ‘मेन इन ग्रीन’ या मेगा स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. दरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकन सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. स्टँडमध्ये बसून आफ्रिदी आपल्या टीमला चिअर करत होता. सामना संपल्यानंतर शोएब मलिकने आपला मित्र शाहिद आफ्रिदीशी संवाद साधला. मलिकने आफ्रिदीला सलाम ठोकला. यानंतर आफ्रिदीनेही त्याला हात दाखवून अभिनंदन केले. या दोघांनी पाकिस्तानसाठी खूप क्रिकेट खेळले आहे. या दोघांनी एकमेकांना दिलेला आदर पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा – T20 WC : तो परत येतोय..! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘जार्वो’चे संकेत; म्हणाला, “भारताला माझी गरज…”

शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा एक महान अष्टपैलू खेळाडू आहे. २०१८ मध्ये तो अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असला तरी तो अजूनही जगभरातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळतो. टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये मलिकने ४५ धावा केल्या आहेत. जरी त्याने जास्त धावा केल्या नसल्या तरी त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीत स्थिरता आणली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो २६ धावांवर नाबाद राहिला.

पाकिस्तानचा पुढील सामना मंगळवारी (२ नोव्हेंबर) अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर नामिबियाशी होणार आहे. पाकिस्तानचा शेवटचा सुपर १२ सामना रविवारी (७ नोव्हेंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर स्कॉटलंड विरुद्ध आहे.