टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंकेनं नामिबीयाचा ७ गडी आणि ३९ चेंडू राखून पराभव केला. नामिबीयाने श्रीलंकेला विजयासाठी ९७ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेनं १३ षटकं आणि ३ चेंडूत ३ गडी गमवून पूर्ण केलं.

श्रीलंकेचा डाव
नामिबीयाने विजयासाठी दिलेल्या ९७ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. संघाच्या १४ धावा असताना कुसल परेला बाद झाला. रुबेन ट्रम्पेलमनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर निसांकाही माघारी परतला. बर्नाड स्कोल्ट्झच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या २६ असताना दिनेश चंडिमल बाद झाला. चौथ्या गड्यासाठी अविष्का फर्नांडो आणि भानुका राजपक्सा यांनी चांगली भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. अविष्काने २८ चेंडूत ३०, तर भानुकाने २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.

नामिबीयाचा डाव
नामिबीयाच्या खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्ट दिसली. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. टप्प्याटप्प्याने फलंदाज तंबूत परतत राहिले आणि श्रीलंकेला विजयासाठी ९७ धावा दिल्या. संघाची धावसंख्या १० असताना बार्ड बाद झाला. त्यानंतर झेन ग्रीन ८ धावा माघारी परतला. तिसऱ्या गड्यासाठी विलियम्स आणि एरास्मुस यांनी चांगली भागीदारी केली. संघाच्या ६८ धावा करेपर्यंत या जोडीने जम बसवला. मात्र ही जोडी तंबूत परतल्यानंतर त्यांच्या मागे एक एक करत सर्वच फलंदाज तंबूत परतले.

नामिबीयाचा संघ- स्टीफन बार्ड, झेन ग्रीन, क्रेग विलियम्स, गेरहार्ड एरास्मुस, डेविड विस, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, निकोल लॉफ्टी इटॉन, रुबेन ट्रम्पेलमॅन, पिकी या फ्रान्स, बर्नार्ड स्कोल्ट्झ

श्रीलंकेचा संघ- पाथुम निस्सांका, कुसल परेरा, दिनेश चंडिमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्सा, दाकुन शनाका, चमिका करुनारत्ने, वानिडु हसारंगा, दुशमंथा चमीरा, महीश थीकशाना, लहिरू कुमारा