टी २० विश्वचषकातीत भारत पाकिस्तान सामन्याला आता दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्याबद्दल आजी माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणही या सामन्याबाबत आपलं मत मांडलं आहे. लक्ष्मणने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी संभाव्य अकरा खेळाडूंची नावे निवडली आहे.

“सलामीला केएल राहुल आणि रोहित शर्माला पसंती देईन. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतला संधी देईन. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असेल. गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह असेल. तर फिरकीपटू म्हणून वरूण चक्रवर्ती आणि राहुल चाहरला संधी देईन. भारतीय संघात ७ दिग्गज फलंदाज आहेत. यामुळे तळाच्या खेळाडूंना फलंदाजी येणं कठीण आहे.”, असं व्हीव्हीएस लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं. जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे लक्ष्मणने निवडलेल्या संघात तीन फिरकीपटू होतील. दुसरीकडे हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसल्याने संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल</p>