भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२१ सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीचा संघ पाकिस्तानविरुद्धचा नाबाद राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारत पाकिस्तान सामना म्हटलं क्रीडाप्रेमींमधली उत्सुकता शिगेला पोहोचते. दोन्ही देशाचे चाहते सोशल मीडियावरून एकमेकांवर टीका करतात. यात आता कंपन्याही मागे नाहीत. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीनं पाकिस्तानी संघाला डिवचणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर काही तासातचं त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

“प्रिय पाकिस्तान संघ, आज रात्रीसाठी तुम्हाला बर्गर आणि पिझ्झा हवा असेल तर थेट मॅसेज करा”, असं ट्वीट झोमॅटोनं केलं आहे. या ट्वीटचा संबंध थेट २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपशी आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघातील काही खेळाडू बर्गर, पिझ्झा खाण्यासाठी गेल्याचा दावा एका चाहत्याने केला होता.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकिस्तान ८९ धावांनी पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तानी संघावर टीकेची झोड उठली. यामुळे झोमॅटोच्या ट्वीटला महत्त्व आहे.

दरम्यान टी २० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान १२ खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यापैकी अकरा खेळाडूंचं नाव सामन्यापूर्वी निश्चित होणार आहे. यात पाकिस्तानच्या शोएब मलिकला अंतिम १२ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये शोएब मलिकची कामगिरी पाहता त्याची निवड करण्यात आली आहे. तसेच मोहम्द हफीजचंही १२ जणांमध्ये नाव आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर १२ मधील पहिला सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. मात्र वर्ल्डकपमधील रेकॉर्ड पाहता दोन्ही संघ आतापर्यत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही वेळा भारताने विजय मिळवला आहे. तत्पूर्वी भारताने सराव सामन्यात दोन विजय मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना पराभूत केलं आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे.