भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या नेतृत्वाचीही परीक्षा असणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र त्याआधी या सामन्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारा भारत आणि पाकिस्तान बऱ्याच काळानंतर मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने या सामन्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

T20 WC: आशियाई खेळपट्ट्यांवर धोकादायक असणारा भारतीय संघ टी-२० मधील सर्वात…; इंझमामने केली भविष्यवाणी

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना पाकिस्तानला संघाला धक्का बसणार नाही असं इंझमामने म्हटलं आहे. “भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान २४ ऑक्टोबरला होणारा सामना हा फायनआधी होणारी फायनल आहे. या सामन्यामुळे प्रचंड चर्चा असून इतकं इथर दुसऱ्या कोणत्या सामन्याबद्दल नसेल. पाकिस्तान संघ टी-२० सहित सर्व प्रकारात उत्तम आहे. त्यामुळे हा एक पाहण्याजोगा सामना असेल,” असं इंझमामने सांगितलं आहे.

जेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचंही इंझमाम-उल-हकने म्हटलं आहे. भारताने दुसऱ्या सराव सामन्यातही मिळवलेल्या विजयानंतर इंझमामन हे वक्तव्य केलं आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सराव सामन्यातही भारताने सहजपणे ऑस्ट्रेलियावर मात केली.

“आशियाई खेळपट्ट्यांवर भारतीय संघ टी-२० मधील सर्वात धोकादायक संघ असून त्यांना नमवणं अशक्य आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाविरोधात सामना पाहिलात तर त्यांनी अत्यंत सहजपणे १५५ धावा करत विजय मिळवला. विराट कोहलीने तर फलंदाजीही नाही केली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरोधात त्यांना कोणतीही अडचण जाणवली नाही,” असं सांगत इंझमामने कौतुक केलं आहे.

“स्पर्धेदरम्यान एखादा संघ जिंकेल असं तुम्ही कधीच सांगू शकत नाही. हा संधींचा भाग आहे. मापण माझ्या मते अमिराती येथील सध्याच्या स्थितीत भारतीय संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार आहे,” असं इंझमामने म्हटलं आहे.

“त्यांना टी-२० क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्यांचे फक्त फलंदाजच नाही, तर गोलंदाजदेखील अनुभवी आहेत,” असं सांगताना इंझमामने स्पर्धेत फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका निभावतील असं म्हटलं आहे.

“अमिरातीमध्ये मी अनेक सामने खेळले असून इथे बॉल खूप फिरतो. त्यांच्याकडे अश्विन आणि जाडेजा असे दोन फिरकी गोलंदाज आहेत. याशिवाय ते स्वत: फिरकी गोलंदाजांविरोधात चांगलं खेळतात. ही त्यांच्या जमेची बाजू आहे,” असं इंझमामने म्हटलं आहे.