शारजा : मुजीब उर रहमान (५/२०) आणि रशीद खान (४/९) या फिरकी जोडीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सोमवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल १३० धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.

अफगाणिस्तानने दिलेल्या १९१ धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव अवघ्या ६० धावांत संपुष्टात आला. तीन षटकांत बिनबाद २७ धावा केल्यानंतर मुजीबने चौथ्या षटकात तीन बळी मिळवून स्कॉटलंडच्या डावाला खिंडार पाडले. मग त्यांची ५ बाद ३६ धावसंख्या असताना गोलंदाजीला आलेल्या रशीदने शेपटाला गुंडाळले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४ बाद १९० अशी धावसंख्या उभारली. मोहम्मद शहझाद (२२) आणि हश्मतुल्ला झझई (४४) यांनी पाच षटकांत ५४ धावांची सलामी दिल्यावर नजीबुल्ला झादरानने (५९) गुरबाजसह (४६) तिसऱ्या गडय़ासाठी ८७ धावांची भागीदारी रचून संघाला पावणेदोनशे धावांपलीकडे नेले.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : २० षटकांत ४ बाद १९० (नजीबुल्ला झादरान ५९, रहमनुल्ला गुरबाज ४६; साफीयान शरीफ २/३३) विजयी वि. स्कॉटलंड : १०.२ षटकांत सर्व बाद ६० (जॉर्ज मुन्सी २५; मुजीब उर रहमान ५/२०, रशीद खान ४/९)

’ सामनावीर : मुजीब उर रहमान