पाकिस्तान संघाने नामिबियाचा पराभव करून टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानचा संघ सलग चौथ्या विजयासह गट २ मध्ये सध्या अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत त्यांचा विजयी प्रवास सुरूच आहे. या संघाने भारत आणि न्यूझीलंडवर ज्याप्रकारे सहज विजय मिळवला होता, त्यानंतर नामिबियावर देखील मोठा विजय मिळवेल, असे मानले जात होते. परंतु नामिबियाने आपल्या खेळावरून स्पष्ट केली की त्यांचा संघ कमकुवत मानला जात असला तरी, सहजासहजी गुडघे टेकवणारा संघ नाही.

नामिबियाने पाकिस्तानी संघाचा धैर्याने सामना केला. बाबर आझम, मोहम्मद रिझवानसारख्या फलंदाजांना गोलंदाजांनी सहज धावा करू दिल्या नाहीत, तर त्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाच्या चेंडूवर चौकार-षटकारही मारले. नामिबियाचा खेळ पाहून खुद्द पाकिस्तान संघही चकित झाला. मोठ्या विजयाची अपेक्षा असताना पाकिस्तानला केवळ ४५ धावांनी विजय नोंदवता आला. या सामन्यात नामिबियाने पाकिस्तानी संघाची अवस्था खराब केली होती. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर क्रेग विल्यम्स, डेव्हिड विस यांनी धमाकेदार फलंदाजी केली.

सामना संपल्यानंतर पाकिस्तानी संघ अचानक नामिबियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. नामिबियाच्या संघाने त्यांचे स्वागत केले. या विश्वचषकातील अप्रतिम प्रवासासाठी पाकिस्तान संघाने नामिबियाचे अभिनंदन केले आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.