आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना उद्या २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या शिबिरात सहभागी असलेल्या चार क्रिकेटपटूंना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान ज्या खेळाडूंना मायदेशी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यात शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे.

टी-२० विश्वचषक पाहता बीसीसीआयने आठ नेट गोलंदाजांची निवड केली होती. यूएईहून परतलेले हे चारही गोलंदाज देशांतर्गत स्पर्धेचा भाग म्हणून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. या चार गोलंदाजांच्या आगमनानंतर उम्रान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल आणि लुकमन मेरीवाला यांना भारतीय संघासोबत कायम ठेवण्यात आले आहे. विश्वचषकादरम्यान बीसीसीआयने वेगवान गोलंदाजांना नेट गोलंदाज म्हणून अधिक महत्त्व दिले आहे. हे चार वेगवान गोलंदाज संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियासोबत राहतील. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा – T20 WC : संघ स्पर्धेबाहेर झाल्यानंतर निराश झाला ‘चॅम्पियन’ क्रिकेटपटू; घेतला धक्कादायक निर्णय!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने संयुक्त अरब अमिरातीमध्ये नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२१ मध्ये ३२ विकेट्स घेतल्या. त्याच्या पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आवेश खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी जम्मू -काश्मीरचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या मोसमात त्याने सर्वात जलद चेंडूचा विक्रमही नोंदवला होता.

“टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात झाल्यानंतर जास्त सराव सत्रे होणार नाहीत. त्यामुळे युएईत थांबलेल्या खेळाडूंना मायदेशी परतल्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेद्वारे सराव करण्याची संधी मिळेल, असे संघ निवडकर्त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे”, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.