टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल-१२ फेरीला प्रारंभ होण्यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज आपल्या पहिल्या सराव सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लडविरुद्धच्या या सराव सामन्यात कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. आजच्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात फलंदाजीचा क्रम आणि सहाव्या गोलंदाजीचा पर्याय या दोन मुद्द्यांवर भारताला प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागेल. असं असतानाच दुसरीकडे चाहत्यांना मात्र हा सामना कधी कुठे आणि कसा पाहता येणार असा प्रश्न पडलाय. तर याच सामन्याच्या पार्श्वभूमीवर सामन्यासंदर्भातील संपूर्ण आढावा आणि तो कधी, कुठे, कसा पाहता येणार याबद्दलचा हा तपशील…

इंग्लंडचा संघ तुल्यबळ
नुकताच ‘आयपीएल’चा १४ वा हंगाम संपल्यानंतर आता २४ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना लवकरच जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सोमवारी इंग्लंड आणि बुधवारी ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढय़ संघांविरुद्धच्या लढती भारताची चाचपणी करणाऱ्या ठरतील. ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन यांचा समावेश नसला, तरीही त्यांचा संघ तितकाच तुल्यबळ वाटत आहे.

रोहितच्या साथीने सलामीला कोण?
अनुभवी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला ‘आयपीएल’मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषकात रोहितच पहिल्या पसंतीचा सलामीवीर असेल, यात शंका नाही. त्यामुळे रोहितच्या साथीने के. एल. राहुल आणि इशान किशन यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. राहुलचा अनुभव पाहता त्याला प्राधान्य मिळू शकते; परंतु किशनकडे पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक शैलीत फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याने त्याची पडताळणी करता येऊ शकते.

मधल्या फळीत चुरस
हार्दिक पंडय़ाला फक्त फलंदाजीच्या बळावर मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागेल. कोहली आणि ऋषभ पंत यांचे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावरील स्थान पक्के असल्याने चौथ्या आणि सहाव्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस असेल.

गोलंदाजीतील सहाव्या पर्यायाची चिंता
हार्दिक सराव सामन्यात गोलंदाजी करण्याची जोखीम पत्करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. वेगवान अष्टपैलू शार्दूल सध्या लयीत असल्याने त्याला सरावाची अधिक संधी देणेही गरजेचे आहे. रवींद्र जडेजा फिरकी अष्टपैलूची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचे त्रिकूट उपलब्ध असून वरुण चक्रवती किंवा रविचंद्रन अश्विनपैकी एकाला संधी दिल्यास भारताकडे सहा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असतील.

सामना किती वाजता सुरु होणार?
भारताचा हा पहिला सराव सामना असणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरु होईल. नाणेफेक सात वाजता होईल आणि साडेसातपासून प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल.

सामना कुठे खेळवला जाणार?
भारत आणि इंग्लंडमधील हा पहिला सराव सामना दुबईमधील आयसीसी अकादमीच्या मैदानात खेळवला जाणार आहे.

भारतीय चाहत्यांना कुठे हा सामना पाहता येईल?
हा सामना भारतीयांना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ तमीळ, स्टार स्पोर्ट्स १ तेलगू आणि स्टार स्पोर्ट्स १ कन्नड या वहिन्यांवर लाइव्ह पाहता येईल.

भारताचा पुढील सराव सामना कधी?
भारताचा पुढचा सराव सामना दोन दिवसांनी म्हणजे २० ऑक्टोबर २०२१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत २४ ऑक्टोबर रोजी स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. तर इंग्लंड २३ तारखेला त्यांचा पहिला सामना वेस्ट इंडिजविरोधात खेळणार आहे.

ऑलाइन कुठे पाहता येणार?
सराव सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे. तसेच तुम्ही loksatta.com वरही या सामन्याचे अपडेट्स पाहू शकता.