टी-२० वर्ल्डकपमध्ये आज आज भारतीय संघ दुबईत न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर हा सामना टीम इंडियासाठी ‘करा किंवा मरो’ असाच आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला एक नव्हे, तर तीन मोठे विक्रम करण्याची संधी असेल.

बाबरला मागे सोडण्याची संधी

शेवटच्या सामन्यात, बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध ५१ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील १३वे अर्धशतक झळकावून विराट कोहलीची बरोबरी केली. आजच्या सामन्यात कोहली ५० धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो पुन्हा एकदा बाबरला मागे टाकेल. गेल्या सामन्यात विराटने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेतही दिले होते.

सॅमीच्या पुढे जाण्याची संधी

विराट कोहलीने ४६ टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार असताना एकूण २७ सामने जिंकले आहेत. आज, जर कोहली न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो या प्रकारात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा जगातील पाचवा कर्णधार ठरेल. या विक्रमात विराट डॅरेन सॅमीला (२७) मागे टाकेल.

हेही वाचा – IND vs NZ : सामन्याच्या काही तासांपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; न्यूझीलंडकडून आली ‘अशी’ बातमी!

षटकारांचे शतक ठोकण्याची संधी

विराट कोहलीने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ९१ सामन्यांमध्ये ९१ षटकार मारले आहेत. आज जर कोहली किवी संघाविरुद्धच्या सामन्यात ९ षटकार मारण्यात यशस्वी ठरला, तर राष्ट्रीय संघासाठी या फॉरमॅटमध्ये तो षटकारांचे शतक म्हणजेच १०० षटकार पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा कोहली जगातील आठवा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरेल. कोहलीपूर्वी रोहित शर्माने १३३ षटकार ठोकले आहेत.