भारतीय संघाचं टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील भवितव्य आता त्यांच्या हाती राहिलेलं नाही. मात्र उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेमधील आपलं आवाहन कायम ठेवण्यासाठी भारत आज स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरले. अफगाणिस्तानविरुद्ध ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये दिमाखदार विजय साजरा केल्यानंतर शुक्रवारी स्कॉटलंडविरुद्धही भारताला विजय अनिवार्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फटक्यांची आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. मात्र या सामन्याआधी गुरुवारी भारतीय संघाने दिवाळी साजरी केली. अनेक क्रिकेटपटूंनी इन्स्टाग्रामवरुन आपल्या कुटुंबियांसोबतचे, जोडीदारासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र भारताचा स्फोटक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याच्या मागे टेबलवर बसून खादडी करणारा भारतीय संघाचा मेन्टॉर महेंद्रसिंग धोनी दिसत असून अनेकांनी त्याच्याबद्दलच्या कमेंट हार्दिकच्या फोटोवर केल्यात.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने १३ चेंडूत नाबाद ३५ धावा करत भारताला २०० चा टप्पा ओलांडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. या धावांच्या आतषबाजीनंतर गुरुवारी सर्वच खेळाडूंनी दिवाळीनिमित्त आपआपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा तर दिल्याच शिवाय स्वत:च्या कुटुंबियांसोबत फोटोही पोस्ट केले. यामध्ये सुर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्वीन, दिपक चहर आणि इतर खेळाडूंचाही समावेश होता. मात्र या साऱ्यामध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या खेळीप्रमाणेच हार्दिक पांड्याची पोस्ट भाव खाऊन गेली. मात्र ती हार्दिक किंवा फोटोत दिसणाऱ्या त्याच्या पत्नीमुळे नाही तर कॅप्टन कूल धोनीमुळे.

हार्दिक पांड्याने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना, “सर्वांना सर्व पांड्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हटलं आहे. या फोटोंमध्ये हार्दिक पांड्यासोबत त्याची पत्नी नताशा स्टँकोविच आणि मुलगा अगस्त्य दिसत आहेत. मात्र या फोटोमध्ये या तिघांपेक्षा धोनीची जास्त चर्चा आहे. कारण या फोटोमध्ये हार्दिक पांड्याच्या मागे दिसणाऱ्या टेबलवर धोनी एका व्यक्तीशी गप्पा मारत बसला आहे. तो गप्पा मारताना त्याच्यासमोरील प्लेटमध्ये गोलगप्पे म्हणजेच पाणीपुऱ्या असल्याचं दिसत आहे.

अनेकांनी धोनी पाणीपुऱ्यांची मज्जा घेतोय याकडे सर्वात आधी लक्ष गेल्याचं म्हटलं आहे. हार्दिक पांड्याच्या पोस्टखालील कमेंटवरुन धोनीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतोय.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीमधील आशा फारच धुसर झाल्या असल्या तरी पूर्णपणे संपलेल्या नाहीत. त्यामुळेच भारतीय संघाला मोठ्या फरकाने जिंकणं अनिवार्य आहे.