टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विक्रम काही खास नाही. न्यूझीलंड संघाने आतापर्यंत टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतावर वर्चस्व गाजवले आहे. यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा पहिलाच पराभव होता. भारताला या मोठ्या पराभवाचा धक्का बसलाच आणि आगामी सामनाही न्यूझीलंडविरुद्ध असल्याने या सामन्याला उपांत्य फेरीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

एक छोटीशी चूक टीम इंडियाच्या आशा भंग करू शकते. टीम इंडियाला आधीच हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमारची चिंता आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या संघातून एक बातमी समोर आली असून, त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. स्फोटक किवी फलंदाज मार्टिन गप्टिल भारताविरुद्धच्या सामन्यासाठी तंदुरुस्त झाला असून तो निवडीसाठी उपलब्ध असेल. खरे तर, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गप्टिलला डाव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. न्यूझीलंडलाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा – T20 WC IND vs NZ : कधी, कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या एका क्लिकवर!

प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या म्हणण्यानुसार, गप्टिल प्रशिक्षण करत आहे आणि तो निवडीसाठी योग्य आहे. अॅडम मिल्ने हा देखील भारताविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो, असेही स्टीड म्हणाले. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी मिल्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दोन्ही संघ

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कप्तान) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कप्तान), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, मार्टिन गप्टिल, काईल जेमीसन, डॅरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सेफर्ट, ईश सोधी आणि टीम साउदी.