टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवल्यानंतर पाकिस्तानने शारजाहवर न्यूझीलंडला ५ गड्यांनी मात दिली आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातून अखेरच्या क्षणी माघार घेतली होती, पण आज पाकिस्तानाने आज न्यूझीलंडला हरवत नाचक्कीचा वचपा काढला आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिस्थिती आणि खेळपट्टीच्या अभ्यासानुसार गोलंदाजी करत पाकिस्तानने न्यूझीलंडला २० षटकात ८ बाद १३४ धावांवर रोखले. शारजाहच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी यांनी किवी फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही. रौफने चार बळी घेतले. प्रत्युत्तरात संथ खेळपट्टीवर पाकिस्तानने आपले आपले पाच गडी गमावले. पण अनुभवी शोएब मलिक आणि आसिफ अली यांनी आक्रमक खेळी करत १९व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. रौफला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह पाकिस्तानने गट-२मध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

पाकिस्तानचा डाव

कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला २८ धावांची सलामी दिली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने बाबरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर आलेला फखर झमानही स्वस्तात बाद झाला. अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजने षटकारासह सुरुवात केली खरी, पण डेव्हॉन कॉन्वेने सीमारेषेवर घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे त्याला तंबूत परतावे लागले. १५व्या षटकापर्यंत पाकिस्तानने ८७ धावांत ५ गडी गमावले. त्यानंतर मात्र अनुभवी फलंदाज शोएब मलिक आणि आसिफ अली यांनी आक्रमक फटकेबाजी केली. या दोघांनी साऊदी आणि बोल्टला मोठे फटके खेळले. मलिक २ चौकार आणि एका षटकारासह २६ तर अली १२ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ईश सोधीने २ बळी घेतले.

न्यूझीलंडचा डाव

सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. संघाच्या ३६ धावा झाल्या असताना पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हरिस रौफने पहिले यश मिळवून दिले. त्याने गप्टिलला (१७) तंबूत धाडले. त्यानंतर केन विल्यमसन मैदानात आला. त्याने मिशेलसह संघाला अर्धशतक गाठून दिले. ९व्या षटकात इमाद वसीमने मिशेलला (२७) तंबूत धाडले. त्यानंतर आलेला जेम्स नीशमही स्वस्तात बाद झाला. विल्यमसनने थोडा संघाला आधार दिला. चांगल्या लयीत खेळणारा किवी कप्तान १४व्या षटकात धावबाद झाला. त्याने २५ धावा केल्या. पुढच्या दोन षटकात संघाचे शतक फलकावर लागले. डेव्हॉन कॉनवेने आक्रमक फटके खेळले, पण १८व्या षटकात रौफने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रौफने याच षटकात ग्लेन फिलिप्सलाही बाद केले. शेवटच्या षटकात किवी संघाला फटकेबाजी करता आली नाही. २० षटकात न्यूझीलंडने ८ बाद १३४ धावा केल्या. पाकिस्तानकडून रौफने २२ धावांत ४ बळी घेतले.

लॉकी फर्ग्युसन बाहेर

पाकिस्तानविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला. संघाचा स्टार जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेबाहेर गेला आहे. पायाच्या दुखापतीमुळे फर्ग्युसन ही स्पर्धा खेळू शकणार नाही. अॅडम मिल्नेने फर्ग्युसनची जागा घेतली.

हेही वाचा – भारताविरुद्ध जोरदार बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूचं ट्वीट; शमीला शिव्या देणाऱ्यांना म्हणाला…

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हरिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टील, डॅरिल मिशेल, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी.