टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा समावेश असणाऱ्या दुसऱ्या गटामध्ये सामन्यांच्या निकालाबरोबरच गुणतालिका म्हणजेच पॉइण्ट टेबलचीही तुफान चर्चा आहे. या गटामध्ये प्रत्येक सामन्याला संघाचं स्थान बदलताना दिसत आहे. पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असला तरी उपांत्यफेरीत जाणारा दुसरा संघ कोण ही चुरस कायम आहे. दुसऱ्या स्थानासाठी भारताबरोबरच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ दावेदार आहे. त्यामुळेच प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन उरलेल्या त्या एका स्थानी आपल्या संघाचं नाव असावं म्हणून तिन्ही संघ जीव ओतून खेळताना दिसत आहेत.

मात्र शुक्रवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष फायदा भारतालाच झालाय. भारताने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये लक्ष्य काढून स्कॉटलंडला पराभूत करण्याबरोबरच आपल्या नेट रन रेटमध्ये चांगली सुधारणा केलीय. तर दुसरीकडे नामिबियाविरुद्धचा सामना जिंकूनही न्यूझीलंडचा नेट रन रेट सुधारण्यात यश आलेलं नाही. सध्या या गटामधील संघांची परिस्थिती काय आहे पाहुयात…

पाकिस्तान –
पाकिस्तानचा संघ चार सामने खेळला असून त्यांनी चारही सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत जाणारे ते या ग्रुप टूमधील पहिला संघ ठरले आहेत. त्याचा नेट रनरेट +१.०६५ इतका आहे. त्यांचा उर्वरित सामना स्कॉटलंडविरोधात असल्याने ते अजिंक्य राहूनच पुढील फेरीत जातील असं म्हटलं जात आहे. पाकिस्तान अव्वल स्थानी आहे.

न्यूझीलंड –
न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामने खेळले असून चार पैकी त्यांनी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. भारत, नामिबिया आणि स्कॉलंडला त्यांनी पराभूत केलं आहे तर पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झालाय. त्यांचा नेट रनरेट हा +१.२७७ इतका आहे. त्यामुळे ते दुसऱ्या स्थानी आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित होणार आहे. नामिबियाविरुद्धचा सामन्यामध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना ९४ धावांवर रोखलं असतं तर त्यांच्या नेट रन रेटमध्ये फारच सुधारणा झाली असती. मात्र नामिबियाच्या संघाने १११ धावा केल्या.

नामिबियावरुद्धचा सामना जिंकला पण…
न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत ४ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. संघाने ८७ धावांवर चार गडी गमावले होते. नंतर ग्लेन फिलिप्सने नाबाद ३९ तर जिमी नीशमने नाबाद ३५ धावा करत स्कोअरकार्ड १६० च्या वर नेलं. या धावांचा पाठलाग करताना नामिबियाला अपयश आलं पण त्यांनी १०० धावांचा टप्पा पार केल्याने सामना जिंकूनही न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये फारसा फायदा झाला नाही.

भारत-
भारताचा आता केवळ एकच सामना बाकी असून भारत आता तिसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडच्या सामन्यांमध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं आहे. भारताला चारपैकी दोन सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने भारताचा दारुण पराभाव केला होता. भारताचा नेट रनरेट हा मागील दोन सामन्यांमधील दमदार कामगिरीमुळे ग्रुपमध्ये सर्वोत्तम आहे. एक सामना शिल्लक असताना भारताचा नेट रन रेट हा +१.६१९ आहे. पण आता उरलेल्या सामन्यामध्ये नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं भारतासमोर आव्हान आहे. मात्र त्याचबरोबर भारताला अफगाणिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

भारतासाठी अफगाणिस्तान न्यूझीलंड सामना महत्वाचा…
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सामना झाल्यानंतर या ग्रुपचं चित्र अधिक स्पष्ट होईल. म्हणजे अफगाणिस्ताने सामना जिंकला तर नामिबियाविरुद्ध किती मोठा विजय मिळवल्यास भारत उपांत्य फेरीत नेट रनरेटच्या जोरावर जाऊ शकतो याचं गणित निश्चित होईल. मात्र न्यूझीलंडने विजय मिळवला तर त्यांचं स्थान उपांत्यफेरीत निश्चित होईल. भारताचा पुढील सामना आठ नोव्हेंबर रोजी नामिबियाविरोधात होणार आहे.

अफगाणिस्तान –
अफगाणिस्तानच्या संघाने चार सामने खेळले असून त्यांनी दोन सामने जिंकलेत दोन गमावले आहेत. त्यामुळेच त्यांचे एकूण चार गुण असून नेट रनरेट +१.४८१ इतका आहे. ते सध्या चौथ्या स्थानी आहेत. त्यांचा उर्वरित सामना हा न्यूझीलंडविरुद्ध आहे. त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला फायदा होईल. कारण असं झाल्यास अफगाणिस्तानचेही सहा गुण होतील आणि उरलेला एक सामना जिंकून न्यूझीलंडही सहा गुणांपर्यंतच मजल मारु शकेल.

नामिबिया आणि स्कॉटलंड –
हे दोन्ही देश अगदीच नवखे असले तरी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र एक सामना वगळता जिंकण्यात त्यांना यश आल्याचं दिसत आहे. स्कॉटलंडला एकही सामना जिंकता आला नाहीय, मात्र नामिबियाने एका सामन्यात विजय मिळवला आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत.