‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशला ६ धावांनी मात दिली. अल एमिरेट्स, ओमान येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्कॉटलंडने २० षटकांत ९ गडी बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ धावांपर्यंत पोहोचता आले.

स्कॉटलंडने २० षटकांत ९ गडी गमावून १४० धावा केल्या. ख्रिस ग्रीव्ह्सने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याने मार्क वॅट (२२) सोबत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून मेहदी हसनने ३ तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा – ‘मेंटॉर’सिंह धोनी..! कॅप्टन कूलची पुन्हा एकदा टीम इंडियात एन्ट्री; पाहा फोटो

प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार हे त्यांचे दोन्ही सलामीवीर वैयक्तिक आणि प्रत्येकी ५ धावांची भर घालून तंबूत परतले. त्यानंतर मुशफिकूर रहिमने (३८) संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्यात तो अपयशी ठरला. कप्तान महमूदुल्लाह खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशला विजयाची आशा होती. पण १९व्या षटकात व्हीलने त्याला बाद करत स्कॉटलंडचा विजय निश्चित केला. स्कॉटलंड़कडून व्हीलने ३ तर ग्रीव्ह्जने २ बळी घेतले.