टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघाने वेगवान फटकेबाजी केली. याच फटकेबाजीमुळे भारताचं या स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये जाण्याची शक्यता आणखीन वाढली आहे. रवींद्र जडेजाच्या (३/१५) प्रभावी फिरकीनंतर के. एल. राहुलने (१९ चेंडूंत ५० धावा) केलेल्या आतषबाजीच्या बळावर भारताने स्कॉटलंडचा तब्बल आठ गडी आणि ८१ चेंडू राखून फडशा पाडला. या विजयामुळे भारताने नेट रन रेटच्या बाबतीत ग्रुप टूमध्ये अव्वस्थान पटकावलं असलं तरी एकूण गुणतालिकेमध्ये भारत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.

मागील दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरीकेली असली तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात झालेला पराभव अजूनही विसरता आलेला नाही. याचीच प्रचिती सामन्यानंतरच्या पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनदरम्यान कोहलीने केलेल्या एका वक्तव्यावरुन आली. सुपर १२ या साखळी सामन्यांच्या फेरीत आधी भारताला पाकिस्तानने १० गडी राखून पराभूत केलं नंतर न्य़ूझीलंडनेही ८ गडी राखुन भारताला पराभूत केलं. या पराभवानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरोधात दमदार पुनरागमन केलं. मात्र पहिल्या दोन सामन्यांमधील पराभव अजूनही विराटच्या मनामध्ये घर करुन बसल्याचं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यानंतर दिसून आलं.

स्कॉटलंडविरुद्ध सामना अवघ्या ३९ चेंडूंमध्ये जिंकत भारताने ८६ धावांचं लक्ष्य आरामात पूर्ण केलं. या विजयामुळे भारताच्या नेट रन रेटमध्ये सुधारणा झालीय. मात्र सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने पाकिस्तानी आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाबद्दल खेद व्यक्त केला. “स्कॉटलंडविरोधात ज्याप्रमाणे काही चांगल्या ओव्हर मिळाल्या त्याप्रमाणे पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील सामन्यांमध्ये मिळाल्या नाहीत,” असं विराट म्हणाला.

भारताने मागील सामन्यात अफगाणिस्तानला ६६ धावांनी पराभूत केलं. मात्र दोन विजय मिळवल्यानंतरही अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यातील निकालावर भारताचं काय होणार हे ठरणार आहे. भारतीय संघाला पुन्हा लय गवसल्याबद्दल कोहलीने सामाधान व्यक्त केलं.

“भारतीय संघाला पाकिस्तान विरोधातील सामन्यात आणि न्यूझीलंडविरोधात अशी कामगिरी करता आली नाही. त्या दोन सामन्यांमध्ये दोन षटकंही आमच्या बाजूने पडली असती तरी त्याचा परिणाम वेगळा झाला असता,” असं कोहली म्हणाला. सध्या सर्व खेळाडू उत्तम खेळ करत असल्याचा आनंद आहे, असंही कोहली म्हणाला.

स्कॉटलंडचा ८५ धावांत खुर्दा केल्यानंतर भारताने निव्वळ धावगतीच्या शर्यतीत अफगाणिस्तानला मागे टाकण्यासाठी निर्धारित लक्ष्य ७.१ षटकांत गाठणे गरजेचे होते. परंतु राहुल आणि रोहित शर्मा (१६ चेंडूंत ३० धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने ६.३ षटकांतच विजय मिळवला.