आजपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२०क्रिकेट विश्वचषकाचे बिगुल वाजले. पात्रता फेरीतील सर्व सामने आजपासून खेळले जाणार असून पहिला सामना हा श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. आशिया चषकाचे विजेते श्रीलंकेला या सामन्यात मोठा धक्का बसला. दुबळ्या नामिबियाने श्रीलंकेचा ५५ धावांनी पराभव केला. पात्रता फेरीतील हा सामना नामिबियाने जिंकून सर्वांनाच धक्का दिला.

सायमंड्स स्टेडियम, जिलाँग येथे  खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात उत्तम कामगिरी केली. टी२० विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होत असताना श्रीलंका सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच नकारात्मक पद्धतीने खेळला. नामिबियाच्या संघाने आशियाई चषक विजेता श्रीलंकेच्या संघाचा ५५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १०८ धावांवर आटोपला. आता श्रीलंकेला सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर सर्व सामन्यांमध्ये चांगला खेळ करावा लागेल.

या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. कर्णधार शनाकाने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याचवेळी नामिबियाकडून डेव्हिड व्हिसा, बर्नार्ड, शिकोंगो आणि फ्रीलिंक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. टी२० विश्वचषकात किंवा टी२० सामन्यात श्रीलंका-नामिबिया यांची समोरासमोर येण्याची ही दुसरी वेळ आहे. हे दोन संघ २०२१ टी२० विश्वचषकात भिडले होते. तेव्हा श्रीलंका वरचढ ठरली होती. त्या सामन्यात नामिबिया अवघ्या ९६ धावासंख्येवरच गारद झाली होती. तो सामना श्रीलंकेने ७ गडी राखून जिंकला होता.