सुरक्षिततेच्या कारणास्तव बांगलादेशच्या संघाने भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपमध्ये खेळण्यास नकार दिला. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकार या मुद्यावर ठाम राहिल्याने अखेर त्यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. निषेधही व्यक्त करण्यात आला. जनभावना लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेतल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात असलेल्या मुस्ताफिझूर रहमान या बांगलादेशच्या खेळाडूला रिलीज करण्याचा आदेश दिला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने लिलावात तब्बल ९.२ कोटी रुपये खर्चून त्याला संघात घेतलं होतं. मात्र त्यांनी बीसीसीआयच्या आदेशाचं पालन केलं.
याचे तीव्र पडसाद बांगलादेशात उमटले. बांगलादेशने आयपीएलचं प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला. भारतात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने सुरक्षेची हमी देताना भारतात कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र बांगलादेशने भूमिका बदलली नाही. त्यांनी सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली. ही मागणी आयसीसीने फेटाळली. आयत्या वेळेला वेळापत्रकात असा बदल करता येणार नाही असं आयसीसीने स्पष्ट केलं.
बांगलादेशने ब गटातून खेळवा अशीही मागणी केली. पण तीही आयसीसीने फेटाळली. आयसीसी सदस्यांनी १४-२ अशा मताने बांगलादेशच्या मागणीला बाजूला सारलं. अखेर बांगलादेशने टी२० वर्ल्डकपमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने यासंदर्भात पुनर्विचार करण्याची विनंती केली पण बांगलादेशने जैसे थे भूमिका कायम ठेवली. आयसीसीने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश केला.
दरम्यान बांगलादेशच्या संघाने भारतात खेळण्यास नकार दिला असला तरी स्पर्धेच्या निमित्ताने बांगलादेशचे अंपायर भारतात असणार आहेत.
बुधवारी नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सराव सामन्यात बांगलादेशचे अंपायर शर्फुदोल्सा सैकत हे कार्यरत होते. त्यांच्या बरोबरीने गाझी सोहेल हेही वर्ल्डकपदरम्यान ऑनड्युटी असणार आहेत.सैकत हे आयसीसीच्या एलिट अंपायर पॅनेलचा भाग आहेत. गाझी हे आयसीसीच्या अंपायर्स पॅनेलचा भाग आहेत. सैकत यांनी ५३ तर सोहेल यांनी ८९ सामन्यात काम पाहिलं आहे.
वर्ल्डकप ही आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धा असल्याने अंपायर्स आणि मॅचरेफरी आयसीसीतर्फेच नियुक्त केले जातात.
दरम्यान सराव सामन्यात भारतीय संघाने ३० धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसनऐवजी इशान किशन हाच भारताचा सलामीवीर असेल हे या सामन्यातून स्पष्ट झालं. हर्षित राणा सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला.

