देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची तारीख आणि सामन्यांच्या ठिकाणांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. सध्या सर्वच संघ टी-२० विश्वचषक २०३६ साठी जोरदार सराव करत आहेत. २०२६च्या सुरूवातीला ही स्पर्धा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली होती, आता या स्पर्धेची तारीख समोर आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याच म्हटलं आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला होण्याची शक्यता आहे. आयसीसीने अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही. आधी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी भारतातील दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद ही पाच शहरे निवडली गेली आहेत.
भारताशिवाय टी-२० विश्वचषक २०२६ चे सामने सह-यजमान श्रीलंकेच्या कोलंबो, पल्लेकेले आणि दाम्बुला किंवा हंबनटोटा यापैकी एका शहरात खेळवले जातील.
टी-२० विश्वचषक २०२६ चे उपांत्य व अंतिम सामने कुठे होणार?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जर भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमनेसामने आले तर पहिला सेमीफायनल सामना कोलंबोमध्ये होईल, तर दुसरी सेमीफायनल मुंबईत होईल. जर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचला नाही तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना मुंबईत खेळवला जाईल.
भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने आले तर सामना श्रीलंकेत तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. अन्यथा स्पर्धेतील अंतिम सामना हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. याशिवाय जर श्रीलंका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर श्रीलंकेचा संघ कोलंबोमध्ये खेळेल.
गट टप्प्यातील भारत पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारतीय संघ मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे त्यांचे लीग सामने खेळण्याची शक्यता आहे. आयसीसी लवकरच संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
सराव सामने अद्याप अनिश्चित आहेत, ते बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे होतील. लखनौमध्येही स्पर्धेचे सराव सामने होण्याची शक्यता आहे.
मागील अहवालानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तुलनेत २०२६ चा टी२० विश्वचषक कमी शहरांमध्ये आयोजित केला जाईल आणि प्रत्येक ठिकाणी किमान ६ सामने खेळवता येतील. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मते २०२५ च्या महिला विश्वचषका सामने खेळवण्यात आलेल्या ठिकाणी टी-२० विश्वचषक आयोजित केला जाणार नाही. गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबई यांना या यादीतून थेट वगळण्यात येईल.
