वृत्तसंस्था, अहमदाबाद

फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे निश्चितपणे आव्हानात्मक असते, पण नियोजनबद्ध खेळ केल्यास धावा होऊ शकतात. भारतीय फलंदाज फिरकीचा यशस्वीपणे सामना करण्यात समर्थ असले, तरी योजनांतही सुधारणा आवश्यक असल्याचे मत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक रायन टेन दोएशहाते यांनी व्यक्त केले.

भारतीय संघातील अव्वल आठपैकी सहा फलंदाज डावखुरे आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ ऑफ-स्पिन गोलंदाजांचा अधिकाधिक वापर करून भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतात. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत हेच पाहायला मिळाले आहे. चार साखळी सामन्यांत मिळून प्रतिस्पर्धी संघातील ऑफ-स्पिन गोलंदाजांनी भारताविरुद्ध सर्वाधिक १०२ चेंडू टाकले आहे. याचा सामना करताना भारतीय फलंदाजांना षटकामागे केवळ ६.२३ धावाच करता आल्या.

‘‘आम्हाला ज्या खेळपट्ट्यांचा सामना करावा लागला, त्या फलंदाजीसाठी फारशा अनुकूल नव्हत्या. अधिक चांगल्या खेळपट्ट्यांवर आमचे फलंदाज फारशे अडचणीत सापडणार नाहीत याचा विश्वास आहे. असे असले तरी, फिरकीविरुद्ध आमच्या फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा निश्चितपणे होऊ शकते. विशेषत: ज्या खेळपट्ट्यांवर चेंडू थांबून बॅटवर येतो, तिथे आम्हाला अधिक नियोजनबद्ध खेळ करावा लागेल,’’ असे दोएशहाते नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला.

‘‘आमचे फलंदाज केवळ ऑफ-स्पिन गोलंदाजांविरुद्ध अडचणीत सापडत आहेत असे म्हणणे उचित ठरणार नाही. डावखुरे फिरकीपटूही आमच्याविरुद्ध यशस्वी ठरत आहेत. गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आमच्या फलंदाजांना ऑफ-स्पिनर आणि डावखुऱ्या फिरकीपटूंच्या १७ षटकांना सामोरे जावे लागले. त्यात आम्ही १२५ धावांत पाच फलंदाज गमावले. ही निश्चितच चांगली कामगिरी नाही,’’ असेही दोएशहातेने नमूद केले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय फलंदाजांना मधल्या षटकांत धावगती राखण्यात अपयश येत आहे. याबाबत विचारले असता, ‘‘केवळ आमचे नाही, सर्वच संघांचे फलंदाज मधल्या षटकांत अडचणीत सापडत आहेत. ‘आयपीएल’ किंवा द्विदेशीय मालिकांमध्ये खेळपट्ट्यांचे स्वरूप पूर्ण २० षटके कायम राहते. मात्र, सध्याच्या स्पर्धेत ‘पॉवर-प्ले’नंतर फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरते आहे. त्यामुळे सर्व फलंदाजांना नियोजनात बदल करावा लागत आहे,’’ असे दोएशहातेने सांगितले. मात्र, भारतीय फलंदाज आगामी सामन्यांत कामगिरी उंचावतील असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

अभिषेकबाबत निश्चिंत

भारताचा तडाखेबंद सलामीवीर अभिषेक शर्मा ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला आहे. असे असले तरी, भारतीय संघ त्याच्या कामगिरीबाबत फारसा चिंतेत नसल्याचे दोएशहातेने स्पष्ट केले. ‘‘अभिषेकला थोडा वेळ द्यायला हवा. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी तो आजारी होता. पहिल्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. तो एका सामन्यालाही मुकला. त्यामुळे त्याला लय मिळविण्यासाठी झगडावे लागणे, हे समजण्यासारखे आहेत. मात्र, आम्ही निश्चिंत आहोत. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने जवळपास ९० मिनिटे फलंदाजीचा सराव केला. यावेळी तो चेंडू चांगल्या पद्धतीने टोलवत होता. त्यामुळे तो बाद फेरीत दमदार कामगिरी करेल याची खात्री आहे,’’ असे दोएशहातेने सांगितले.

सरळ बॅटने खेळावे -गावस्कर

सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या अभिषेकने किमान डावाच्या सुरुवातीला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मांडले आहे. ‘‘अभिषेक गुणी मुलगा आहे, पण बहुधा अपेक्षांचे दडपण हाताळणे त्याला अवघड जात आहे. अमेरिकेविरुद्ध सलामीच्या लढतीत त्याच्याकडून धावा झाल्या असत्या, तर त्यानंतर तो कोणतेही दडपण न घेता खेळू शकला असता. आता त्याने योजनेबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची आणि धावांचा वेग कधीही वाढविण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याने सुरुवातीला वेळ घेतल्यास हरकत नाही. विशेषत: त्याने आडव्या बॅटने फटके खेळणे टाळले पाहिजे,’’ असे गावस्कर म्हणाले.