न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -२० विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द केल्यामुळे इम्रान खान यांनी स्वत: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना फोन करून सुरक्षेचे आश्वासन दिले होते, पण जॅसिंडा अर्डर्न यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांकडे दुर्लक्ष केले. यानंतर इम्रान खान पाकिस्तानी संघाची भेट घेत अपमानाचा बदला घ्या, असे आवाहन केले आहे. ‘आपने घबराना नहीं’ असे म्हणत त्यांनी खेळाडूंना आधार दिला. 

एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी पाकिस्तानी खेळाडूंना टी -२० विश्वचषकात चांगले खेळून न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द केल्याचा बदला घेण्यास सांगितले. दरम्यान, न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरे रद्द केल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी संघाला भेटून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानी सिनेटर फैसल जावेद म्हणाले की, पंतप्रधानांनी खेळाडूंना भारताविरुद्ध निर्भयपणे क्रिकेट खेळण्यास सांगितले.

यापुर्वी पाकिस्तानमधील पाकिस्तानचे सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी मंत्री तोंड लपवण्यासाठी भारताकडे बोट दाखवले होते. फवाद चौधरी म्हणाले होते “न्यूझीलंड क्रिकेट संघाला पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याची धमकी भारतातून आली होती. तसेच ईमेल हा भारतातून आला होता”, असं पाकिस्तानातील मंत्री फवाद चौधरी यांनी दावा केला आहे. “सिंगापूर स्थान दाखवणाऱ्या व्हीपीएनद्वारे भारतातून हा ईमेल तयार करण्यात आल आहे.” असंही त्यांनी पुढे सांगितलं. दुसरीकडे, संघ मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने धमकीची माहिती मिळाली, पण तपशील दिला नसल्याचं सांगितलं. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

यापूर्वी मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतलो होते.