जागतिक क्रिकेटमध्ये त्यातही खास करुन टी २० प्रकारामध्ये जायंट किलर अर्थात मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी स्कॉटलंडने दणका दिलाय. आपल्या पहिल्याच सामन्यात बांगला देशला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. नवख्या स्कॉटलंडच्या संघाने बांगला देशला सहा धावांनी पराभूत केलंय. या पराभवामुळे बांगलादेशचं या स्पर्धेतील भविष्य काय असेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. हा पराभव बांगलादेशला फार महागात पडू शकतो. या पराभवामुळे बांगलादेशवर स्पर्धेबाहेर फेकलं जाण्याची वेळ येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कॉटलंडची भन्नाट फलंदाजी…
ओमानमधील अल एमिरेट्समध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्कॉटलंडने २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्कॉटलंडच्या ख्रिस ग्रीव्ह्सने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याने मार्क वॅट (२२) सोबत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून मेहदी हसनने ३ तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी २ बळी घेतले.

बांगलादेश कसा खेळला?
धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार हे त्यांचे दोन्ही सलामीवीर वैयक्तिक आणि प्रत्येकी ५ धावांची भर घालून तंबूत परतले. त्यानंतर मुशफिकूर रहिमने (३८) संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्यात तो अपयशी ठरला. कप्तान महमूदुल्लाह खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशला विजयाची आशा होती. पण १९व्या षटकात व्हीलने त्याला बाद करत स्कॉटलंडचा विजय निश्चित केला. स्कॉटलंड़कडून व्हीलने ३ तर ग्रीव्ह्जने २ बळी घेतले.

…तर स्वप्न भंग होणार
पहिल्या फेरीतील दोन सामन्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा यंदा फारच रोमांचक होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. पहिल्याच सामन्यात नवख्या स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. सध्या पहिल्या सामन्यानंतर स्कॉटलंड आणि ओमान यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ या पराभवामुळे पात्र होणार की नाही याबद्दलच अजून चिंतेत असल्याचं दिसत आहे. आता सुपर १२ म्हणजेच अंतिम १२ संघांमध्ये पोहचून मुख्य स्पर्धा खेळण्यासाठी बांगलादेशला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. स्कॉटलंडने दिला तसाच आणखीन एखादा धक्का बांगलादेशला मिळाला तर अंतिम १२ मध्ये खेळण्याचं त्यांचं स्वप्न भंग होईल.

कोण कसं पात्र होणार?
टी २० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीमध्ये आठ संघ खेळत आहेत. या आठ संघांना प्रत्येकी चार नुसार दोन गटांमध्ये वाटण्यात आलं आहे. प्रत्येक गटातून दोन संघांना अंतिम १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गटांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी राहणारे संघ पात्र ठरतील. बांगलादेश ब गटामध्ये आहे.

ब गटाची स्थिती काय?
बांगलादेशचा एक सामना झाला असून अजून दोन सामने बाकी आहेत. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा सामना यजमान ओमानसोबत होणार आहे. त्यानंतर बंगलादेश पापुआ न्यू गिनीविरुद्ध २१ ऑक्टोबर रोजी मैदानात उतरले. या दोन्ही सामन्यांमध्ये आता बांगलादेशला केवळ विजय मिळवणं पुरेसं नसणार तर त्यांना मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागणार आहेत. ओमानच्या संघाने पापुआ न्यू गिनीला १० गडी राखून पराभूत केलं असल्याने त्यांची अंतिम १२ मधील दावेदारी अधिक पक्की झालीय. म्हणूनच बांगलादेशला आता पुढील सामने जपून खेळावे लागणार आहेत. सध्या ब गटात ओमान पहिल्या क्रमांकावर, स्कॉटलंड दुसऱ्या तर बांगलादेश तिसऱ्या आणि पापुआ न्यू गिनी चौथ्या स्थानी आहे. मागील काही कालावधीमधील कामगिरीनंतर बांगलादेशचा संघ हा भारत आणि पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचा दावा बांगलादेशी चाहते करत असल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं होतं. मात्र या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील पराभावामुळे बांगलादेशी चाहत्यांचाही मोठा अपेक्षाभंग झालाय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup ban v sco match difficult road for bangladesh after defeat from scotland scsg
First published on: 18-10-2021 at 08:33 IST